
MPSC Combine Exam : ९० हजारहून अधिक विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट Telegram वर लीक?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची संयुक्त पूर्व परीक्षा येत्या ३० एप्रिलला होणार आहे. परीक्षेला अगदी एक आठवडा राहिलेला असताना आता एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. या परीक्षेचे प्रवेश पत्र अर्थात हॉल तिकीट टेलिग्रामवर लीक झाल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे आता सोशल मीडियावर परीक्षार्थी तसंच नेटकरी व्यक्त होऊ लागले आहेत.
साम टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, ३० एप्रिल रोजी होणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संयुक्त पूर्व परीक्षा गट ब,क या परीक्षांचे प्रवेश पत्र हॅक करण्यात आलं आहे. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचा खासगी डेटा लीक झाला आहे.
९० हजाराहून अधिक विद्यार्थ्यांची माहिती टेलिग्राम चॅनलवर अपलोडही करण्यात आली आहे. त्यामुळे या चॅनलवरून कोणीही सहज हे हॉल तिकीट डाऊनलोड करून घेऊ शकत आहे. सोशल मीडियावर आता या गोष्टीची चर्चा सुरू झाली असून याबद्दल MPSC कडून अद्याप कोणतंही स्पष्टीकरण आलेलं नाही.