
MPSC : महाराष्ट्र नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची जाहीरात प्रसिद्ध; 673 पदांकरीता भरती
मुंबईः महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागातील ६७३ पदांकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत परीक्षेची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-२०२३, दि. ४ जून २०२३ रोजी ही परीक्षा होईल.
महाराष्ट्रातील ३७ जिल्ह्यांमध्ये ४ जून रोजी परीक्षा होणार आहे. यामध्ये सामान्य प्रशासन विभागामध्ये २९५ पदे, पाणी पुरवठा व स्वच्छता, जलसंपदा, मृदा व जलसंधारण विभागात १३० पदे, सार्वजनिक बांधकाम विभागात १५ पदे, अन्न व नागरी विभागात ३९ पदे, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागात १९४ पदांकरीता परीक्षा होणार आहे.
परीक्षेचा तपशील
राज्यसेवा मुख्य परीक्षा ७,८ आणि ९ ऑक्टोबर २०२३ रोजी होईल. महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट-अ, ब मुख्य परीक्षा १४ ऑक्टोबर २०२३ रोजी होईल. महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा गट-ब मुख्य परीक्षा १४ ऑक्टोबर रोजी होईल. तसेच निरीक्षक वैधमापन शास्त्र गट-ब मुख्य परीक्षा २१ ऑक्टोबर रोजी होईल तर अन्न व औषध प्रशासकीय सेवा, गट-ब मुख्य परीक्षा २८ ऑक्टोबर रोजी होईल.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने यासंबंधीची सविस्तर जाहीरात संकेतस्थळावर प्रसिद्ध केली असून अटी व शर्तींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहेत.