चौदाशे पोलिसांना ‘पीएसआय’ होण्याची आस
औरंगाबाद - गेल्या वर्षी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (एमपीएससी) खातेअंतर्गत पोलिस उपनिरीक्षक पदासाठी पूर्व व मुख्य परीक्षा झाली; पण अद्यापही मैदानी चाचणी झाली नाही, त्यामुळे एक हजार ४६९ उमेदवारांना रुखरुख लागली आहे. मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालून समस्या सोडवावी, अशी मागणी मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची आहे.

पोलिस दलात खातेअंतर्गत पोलिस उपनिरीक्षक पदासाठी ता. १४ जून २०१७ रोजी जाहिरात प्रसिद्ध झाली होती. ३२२ जागांसाठी १० सप्टेंबर रोजी पूर्वपरीक्षा झाली. यात उत्तीर्ण चार हजार आठशे उमेदवारांची २४ डिसेंबरला मुख्य परीक्षा झाली. त्यात एक हजार ४६९ जण पात्र ठरले. त्यांची मैदानी चाचणी होऊन उपनिरीक्षकपदाची प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित होते; परंतु संबंधित प्रकरण ‘मॅट’मध्ये गेल्याने मैदानी चाचणी होऊ शकली नाही. त्यामुळे आम्ही हवालदिल झालो. पूर्ण मेहनतीने परीक्षा दिल्या, एकीकडे कामाचा ताण असल्याने शारीरिक, मानसिक नुकसान होत आहे. मैदानी चाचणी घेऊन प्रक्रिया पूर्ण कधी होईल याची आम्ही आस लावून बसलो आहोत, अशा भावना पात्र उमेदवारांनी व्यक्त केल्या. मुख्यमंत्र्यांनी आमच्या समस्येत त्वरित लक्ष घालून त्या सोडविण्यासाठी पावले उचलावीत, असेही पात्र उमेदवारांचे म्हणणे आहे.
प्रक्रिया त्वरित पूर्ण करा
मैदानी चाचणी न झाल्याने आम्ही गोंधळात आहोत. एकीकडे मैदानी चाचणीचा सराव करावा, की आगामी उपनिरीक्षकपदाच्या पूर्वपरीक्षेची तयारी करावी. या संभ्रमात आम्ही आहोत. मैदानी चाचणी घेऊन त्वरित प्रक्रिया पूर्ण करावी, अशी आमची भावना असल्याचेही पात्र उमेदवारांनी सांगितले.