
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने राज्यसेवा २०२१ ची सर्वसाधारण गुणवत्तायादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
MPSC Merit List : राज्यसेवेची सर्वसाधारण गुणवत्तायादी जाहीर
पुणे - महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने राज्यसेवा २०२१ ची सर्वसाधारण गुणवत्तायादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रमोद चौगुले ६३३ गुणांसह राज्यात प्रथम आला असून, ६१६ गुण प्राप्त करत शुभम पाटील दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर मुलींमध्ये सोनाली मेत्रे प्रथम तर राज्याती तिसरी आली आहे. उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांच्यासह २० पदांच्या ४०५ जागांसाठी ही निवड यादी जाहिर करण्यात आली आहे.
मे २०२२ मध्ये राज्यसेवेची मुख्य परिक्षा घेण्यात आली होती. सदर परीक्षेची गुणवत्ता यादी आज जाहीर करण्यात आली. विशेष म्हणजे प्रमोद चौगुले हे २०२० च्या परीक्षेतही राज्यात प्रथम आले होते. त्यावेळी त्यांची निवड जिल्हा उद्योग अधिकारी या पदी झाली होती. आयोगाच्या वतीने सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
तसेच संवर्गाचे पसंतीक्रम सादर करण्याकरीता ३ मार्च ते १० मार्च पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. गुणवत्तायादी निव्वळ तात्पुरत्या स्वरूपाची असून, अर्जामधील विविध दाव्यांच्या अनुषंगाने कागदपत्रांच्या पडताळणीनंतर उमेदवारांच्या दाव्यामध्ये बदल होऊ शकतो, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.