Devendra Fadanvis: 'देवेंद्र फडणवीसांच्या एंट्रीनंतरच राज्यातील राजकारण गढूळ'; पूर्वाश्रमीच्या भाजप नेत्याचा आरोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadanvis

Devendra Fadanvis: 'देवेंद्र फडणवीसांच्या एंट्रीनंतरच राज्यातील राजकारण गढूळ'; पूर्वाश्रमीच्या भाजप नेत्याचा आरोप

राष्ट्रवादी (शरद पवार गटाचे) नेते आमदार एकनाथ खडसे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी वैयक्तिक त्रास दिल्याचाही गंभीर आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 2014 मध्ये राज्याच्या राजकारणात एंट्री झाल्यानंतरच राज्यातील राजकारण गढूळ झाल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे.

काय म्हणालेत एकनाथ खडसे?

'गेल्या चाळीस वर्षांपासून मी राज्याचे राजकारण पाहत आहे. मी आता सातव्यांदा आमदार झालो. राज्याचा राजकारणाचा स्तर 2014-15 पासून खाली गेला. 2019 नंतर तर तो प्रचंड खाली गेला आहे. आधी यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक, शरद पवार, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदेंसारखे लोक मुख्यमंत्री होऊन गेलेत.'

'त्यांनी कधीही आपला संयम सोडला नाही. पण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर राज्याच्या राजकारणाची दिशा बदलली आहे. एकमेकांचं सुड उगवणारं अशा स्वरुपाचं राजकारण सुरू आहे. मला विरोध करतो का, तुला बघून घेऊ असं राजकारण सध्या सुरू झालं आहे. यासाठी ईडी, सीबीआय, इनकम टॅक्स यांचाहीवापर राजकारणात केला जाऊ लागला आहे, अशी टीका एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे.

त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अनेक गोष्टी शिकवण्यात माझाच हात आहे, असंही खडसे म्हणाले आहेत. 2014 पुर्वी मीच विधानसभेत त्यांना माझ्या मागची जागा दिली. अनेक चर्चांमध्ये माझ्याऐवजी त्यांना संधी दिली. अनेक प्रश्न त्यांनी त्यांच्या कौशल्याने उचलले. त्यानंतरच्या कालखंडात त्यांनी कुरघोडी करण्याचे अनेक प्रयत्न केल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

पुढे ते म्हणाले की, मला मात्र, या गोष्टीचं दु:ख आहे, ज्या माणसाला प्रदेशाध्यक्ष करण्यात मोठी मदत केली, त्यामुळेच ते मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आले. पुढे त्यांनीच व्यक्तीगतरित्या माझा छळ करण्याची भूमिका घेतल्याचंही खडसे म्हणाले आहेत.