काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा मुकुल वासनिकांच्या हातात?

श्रीधर ढगे
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

अध्यक्षपदासाठी प्रियांका गांधी यांच्‍यासह काही नावे चर्चेत आहेत. त्‍यामुळे अध्यक्षपदाची सुत्रे जरी प्रियांका गांधी यांच्‍या हाती आली तरी कार्याध्यक्षपदी मुकुल वासनिक यांची निवड पक्‍की मानली जात आहे.   

खामगाव : राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्‍यानंतर काँग्रेसच्‍या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी काही नावे चर्चेत आहेत. त्‍यामध्ये महाराष्ट्रातील काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांचेही नाव असून त्‍यांची काँग्रेसच्‍या राष्ट्रीय अध्यक्षपदी किंवा कार्यकारी अध्यक्षपदी निवड होण्याची शक्‍यता आहे.

लोकसभा निवडणूकीत काँग्रेस पक्षाच्‍या पराभवाची नैतिक जबाबदारी स्‍विकारत दोन वर्षाआधीच अध्यक्ष पदाची धुरा सांभाळणारे राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणूकीनंतर राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. दरम्‍यान त्‍यांनी राजीनामा मागे घ्यावा आणि आपल्‍या पदाची धुरा पुन्‍हा सांभाळावी असा आग्रह पक्षातील नेत्‍यांनी धरला. परंतु राहुल गांधी त्‍यांच्‍या मतावर ठाम होते. आता काँग्रेस अध्यक्ष पदाच्‍या निवडीसाठी हालचाली सुरु झाल्‍या असून  महाराष्ट्रातील कॉंग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांचे नाव चर्चेत आहे.

अध्यक्षपदासाठी प्रियांका गांधी यांच्‍यासह काही नावे चर्चेत आहेत. त्‍यामुळे अध्यक्षपदाची सुत्रे जरी प्रियांका गांधी यांच्‍या हाती आली तरी कार्याध्यक्षपदी मुकुल वासनिक यांची निवड पक्‍की मानली जात आहे.   

मुकुल वासनिक हे यूपीए सरकारमध्ये सामाजिक न्याय मंत्री होते. त्यांनी काँग्रेस सरचिटणीसपदाची धुरा सांभाळलेली आहे. १९८४ ते १९९० या काळात वासनिक युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते. एनएसयूआयचे राष्ट्रीय अध्यक्षपदही त्यांच्याकडे होते. सर्वात युवा खासदार होण्याचा मान वासनिक यांना मिळाला होता. वयाच्या २५ व्या वर्षी १९८४ मध्ये ते महाराष्ट्रातील बुलडाणा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतर १९९१, १९९८ मध्ये बुलडाणा मतदारसंघातून तर २००९ मध्ये रामटेक मतदारसंघातून ते निवडून आले. २०१४ च्या निवडणुकीत रामटेकमधून त्यांचा पराभव झाला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळकृष्ण वासनिक यांचे मुकुल वासनिक यांचे ते पुत्र आहेत. बुलडाणा जिल्‍ह्‍यासह महाराष्ट्रात मुकुल वासनिक यांना मानणारा मोठा वर्ग आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mukul Wasnik might be appointed as president of congress