
Mumbai Airport:'विमानतळावर निळ्या पिशवीत बॉम्ब..';मुंबई पोलिसांना एका अज्ञात व्यक्तीचा कॉल, संपूर्ण परिसराची झडती
Fake Call at Mumbai Airport:मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी पोलिसांना विमानतळावर बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्याने खळबळ उडाली होती. पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, अज्ञात कॉलरने दावा केला की विमानतळ कॅम्पसमध्ये निळ्या पिशवीत बॉम्ब आहे. असा फोन आल्यानंतर तातडीने बॉम्बशोधक पथक तैनात करण्यात आले. मात्र, झडतीदरम्यान असे काहीही आढळून आले नाही. हा फोन कॉल पूर्णपणे बनावट असल्याचे निष्पन्न झाले. पोलीस अधिकारी आणि बॉम्बशोधक पथकाने मिळून विमानतळावर शोधमोहीम राबविल्याची माहिती आहे. त्यानंतर हा कॉल पूर्णपणे फेक असल्याचे जाहीर करण्यात आले.
कॉल करणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू असल्याचे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. ज्या क्रमांकावरून कॉल करण्यात आला होता त्याचा मागोवा घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याआधी ऑगस्टमध्ये मुंबई आणि दिल्ली देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानतळांवर बॉम्ब आहे, अशा कॉल्सच्या घटना घडला होत्या. एका अज्ञात कॉलरने मुंबई पोलिसांना फोन करून हा दावा केला होता, मात्र ही बॉम्बची धमकी खोटी निघाली. कॉल आल्यानंतर काही वेळातच पोलीस आणि इतर यंत्रणांनी संपूर्ण विमानतळाची तपासणी केली, मात्र काहीही संशयास्पद आढळले नाही.
शाळेत बॉम्ब असल्याची माहिती अफवा ठरली
गेल्या गुरुवारी दिल्लीतील आरके पुरम भागात असलेल्या लाल बहादूर शास्त्री शाळेच्या परिसरात बॉम्ब असल्याची माहिती ई-मेलद्वारे मिळाली होती. मात्र, नंतर ही अफवा ठरली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेच्या अधिकाऱ्यांना बुधवारी ई-मेल मिळाला होता, त्यानंतर त्यांनी गुरुवारी त्याची चौकशी केली आणि पोलिसांना माहिती दिली.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की बॉम्ब निकामी पथकाच्या कर्मचार्यांनी सकाळी 8 वाजता परिसराची झडती घेतली आणि त्यांना काहीही संशयास्पद आढळले नाही. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी शाळेत 400 विद्यार्थ्यांची परीक्षा होणार होती. बॉम्बशोधक पथकाने कॅम्पसची झडती घेतल्यानंतर परीक्षा सुरळीत पार पडली. (Latest Marathi News)