
Jayant Patil : 'क्या गम हैं जिसको छुपा रहें हो...' जयंत पाटलांचं देवेंद्र फडणवीसांच्या वर्मावर बोट
मुंबईः राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. आज अर्थसंकल्पावर बोलतांना आमदार जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या वर्मावर बोट ठेवलं. 'तुम इतना जो मुस्कुरा रहें हो...' या गाण्याच्या ओळी म्हणत पाटलांनी देवेंद्र फडणवीसांना चिमटा घेतला.
अर्थसंकल्पावर बोलतांना जयंत पाटील म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी शेवटच्या अर्थसंकल्पाप्रमाणे हा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पामध्ये केवळ फसव्या घोषणा होत्या, त्यामुळे त्याची भूरळ महाराष्ट्रातल्या जनतेला पडणार नाही.
हेही वाचाः हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान?
यावेळी जयंत पाटलांनी एक जुनं गाणं म्हणत फडणवीसांच्या वर्मावर बोट ठेवलं. ते म्हणाले की, गुवाहाटीचं बंड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील, असं वाटत होतं. परंतु तसं झालं नाही. त्यांना निदान किंगमेकर व्हायचं होतं, तेही ते झाले नाही. किंगमेकर दिल्लीत बसले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांच्या जखमांना कुरवाळतांना जयंत पाटील म्हणाले की,
तुम इतना जो मुस्कुरा रहे हो
क्या गम है जिसको छुपा रहे हो
आँखों में नमी हँसी लबों पर
क्या हाल है क्या दिखा रहे हो
या ओळी म्हणत त्यांनी सभागृहात हशा पिकवला. ते पुढे म्हणाले की, फडणवीस जेव्हापासून उपमुख्यमंत्री झाले आहेत तेव्हापासून त्यांचा चेहरा बघत आलोय. सात-आठ महिन्यांपूर्वी जेव्हा त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा त्यांना चेहऱ्यावरचे भाव लपवण्याच तंत्र जमलं नव्हतं, असंही जयंत पाटील म्हणाले.