लातूरमधून 300 मुलींची तस्करी नाही - केसरकर

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 12 ऑगस्ट 2017

मुंबई - वधू-वर सूचक मंडळे ही सामाजिक गरज असते. त्यांच्यावर सरसकट बंधने घालता येणार नाहीत. मात्र जर कोणत्या वधू-वर सूचक मंडळाने अल्पवयीनाचे लग्न लावले, बळजबरीने कोणाचे लग्न लावले, अशी तक्रार आल्यास त्या मंडळाची संपूर्ण चौकशी करण्यात येईल. त्या मंडळाच्या माध्यमातून आधी झालेल्या लग्नांचीही चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत केली. लातूरमधून 300 मुलींची तस्करी झालेली नसल्याचेही त्यांनी आकडेवारीनिशी सांगितले.

लातूरमधील वधू-वर सूचक मंडळाच्या माध्यमातून 300 मुलींची तस्करी केल्याचा मुद्दा अल्पकालीन चर्चेच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आला होता. मनीषा चौधरी, वर्षा गायकवाड, भारती लव्हेकर, मंदा म्हात्रे यांनी या चर्चेत भाग घेतला. 'वधू-वर सूचक मंडळाच्या माध्यमातून हा प्रकार सुरू होता. एका 11 वर्षांच्या मुलीचे 34 वर्षांच्या पुरुषाशी लग्न लावून देण्यात आले. 300 मुलींची तस्करी करण्यात आली आहे,'' असे सांगून चौधरी यांनी वधू-वर सूचक मंडळांची सरकारकडे नोंदणी बंधनकारक करावी, अशी मागणी केली. महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांत या प्रकरणाची पाळेमुळे आहेत. देशभरात मानवी तस्करीच्या माध्यमातून 500 कोटींची उलाढाल होते. त्यामुळे या प्रकरणाची "एसआयटी' चौकशी करण्याची मागणी अमित देशमुख यांनी केली.

लातूरमध्ये जे प्रकरण घडले त्या प्रकरणी दहा आरोपींना अटक करण्यात आल्याचे सांगून दीपक केसरकर म्हणाले, ""लातूरमध्ये 300 मुलींची तस्करी झालेली नाही. 2015 मध्ये 61 मुली हरविल्याची तक्रार होती. त्या सर्व परत मिळाल्या आहेत. 2016 मध्ये हरविलेल्या 60 मुलींपैकी 59 सापडल्या तर 2017 मध्ये 59 मुली हरविल्या असून त्यातील 48 सापडल्या आहेत. मुलींना पळविणाऱ्या एका टोळीचे प्रकरण उघडकीस आले आहे.''

Web Title: mumbai maharashtra 300 girls were not smuggling from Latur