Mahalabharthi Yojana : शासन आपल्या दारीसाठी ‘महालाभार्थी’ची मदत mumbai maharashtra Mahalabharthi Yojana portal shasan aaplaya dari | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shasan Aapalya Dari

Mahalabharthi Yojana : शासन आपल्या दारीसाठी ‘महालाभार्थी’ची मदत

मुंबई - ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम प्रत्येक जिल्ह्यात सुरु असून एकाच ठिकाणी एका छताखाली नागरिकांना वेगवेगळे लाभ मिळावेत अशा रीतीने योजना करण्यात आली आहे. या उपक्रमाची व्याप्ती वाढविण्यासाठी आता महालाभार्थी पोर्टलमधून नागरिक स्वत: किंवा प्राधिकृत केंद्रावर माहिती भरूनसुद्धा योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत.

‘शासन आपल्या दारी’ योजनेचा आढाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी सह्याद्री अतिथिगृह येथे घेतला. यावेळी या अभियानाची जबाबदारी सांभाळणारे मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव डॉ. अमोल शिंदे यांनी सादरीकरण केले व ही योजना कशारीतीने राबविण्यात येत आहे त्याची माहिती दिली. तर एमकेसीएलतर्फे विवेक सावंत यांनी महालाभार्थी पोर्टलचे सादरीकरण केले.

या सादरीकरणाच्या माध्यमातून संपूर्ण योजनेची व्याप्ती सांगण्यात आली. त्याचप्रमाणे याची व्याप्ती आणखी वाढवून महिलांसह अन्य लाभार्थ्यांना या योजनेचा फायदा मिळावा याबाबत मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन केले. जास्तीत जास्त नागरिकांना सहज सुलभ लाभ मिळावेत म्हणून या पोर्टलचा देखील उपयोग करण्याबाबत त्यांनी सूचना केली.

मुख्य सचिव मनोज सौनिक, अर्थ विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार, जलसंधारण विभागाचे अपर मुख्य सचिव तसेच इतर वरिष्ठ अधिकारी या बैठकीस उपस्थित होते. ‘महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (एमकेसीएल) यांनी ‘महालाभार्थी’ हे पोर्टल तयार केले आहे.

नागरिकाने या पोर्टलमध्ये स्वतःची माहिती सादर केल्यानंतर, कोणत्या शासकीय योजनांसाठी हा नागरिक पात्र ठरू शकेल याची एक संभाव्य यादी उपलब्ध होते. या प्रत्येक योजनेसाठी नागरिकाने कोठे संपर्क साधणे अपेक्षित आहे व आवश्यक कागदपत्रे कोणती, याचीही माहिती नागरिकास मिळते. यामुळे नागरिकांना सहजपणे संबंधित योजनेसाठी अर्ज करता येणार आहे.

मदतीसाठी स्वयंसेवक उपलब्ध

नागरिकांना जवळच्या प्राधिकृत केंद्रावर जाण्यासाठी प्रोत्साहन देणे, अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे नागरिक घेऊन जातील याची दक्षता घेणे, छापील अर्ज भरण्यासाठी नागरिकांना मदत करणे, केंद्रावर येणाऱ्या नागरिकांच्या सुविधेसाठी प्रयत्न करणे, यासाठी स्वयंसेवक नियुक्त करण्यात येणार आहेत. नागरिकाला योजनांची माहिती देणारे पत्र मिळाल्यानंतर त्यांना प्रत्यक्ष योजनांचा लाभ मिळावा यासाठी पाठपुरावा यासाठी काही स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्यात येणार असून हे स्वयंसेवक नागरिकांना याकामी मदत करतील.

अशी असेल प्रक्रिया

  • जिल्ह्यातील एमएससीआयटी केंद्र, सीएससी केंद्र, इतर संगणक प्रशिक्षण केंद्र यांना यासाठी प्राधिकृत करण्यात येणार

  • या केंद्रांच्या नावांना प्रसिद्धी दिली जाईल

  • नागरिक जवळच्या केंद्रावर जाऊन ‘महालाभार्थी’ पोर्टलवर नोंदणी करून शासकीय योजनांची माहिती विनामूल्य मिळवू शकतील

  • ‘महालाभार्थी’ पोर्टलवर नोंदणीसाठी अर्जाचा छापील नमुना भरल्यावर संबंधित व्यक्तीचे खाते तयार करणार

  • माहिती भरल्यानंतर पोर्टलद्वारे संबंधित नागरिकास लागू होणाऱ्या संभाव्य योजनांची माहिती देणारे, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या स्वाक्षरीचे पत्र तयार करून या पत्राची प्रत नागरिकास देण्यात येईल

  • पत्र घेऊन नागरिक संबंधित कार्यालयात जाऊन, योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता करून योजनेसाठी अर्ज करू शकेल

  • ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊन योजनेचा अर्ज भरता येईल.