'मी मुख्यमंत्री बोलतोय'वर साडेचार कोटी होणार खर्च

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 17 जानेवारी 2018

मुंबई - राज्यातील जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी तसेच सरकार राबवत असलेल्या विविध जनकल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोचवण्याच्या दृष्टीने दृकश्राव्य माध्यमांसाठी जय महाराष्ट्र, दिलखुलास आणि मी मुख्यमंत्री बोलतोय हे प्रसिद्धीचे कार्यक्रम राबवण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या खर्चापोटी सन 2018 या वर्षासाठी सरकार साडेचार कोटी रुपये खर्च करणार आहे. याबाबतच्या निधीला सामान्य प्रशासन विभागाने मंजुरी दिली आहे.

जय महाराष्ट्र, दिलखुलास, मी मुख्यमंत्री बोलतोय व अन्य प्रासंगिक कार्यक्रमांच्या चित्रीकरण प्रसिद्धीसाठीच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. 5 ऑक्‍टोबर 2017 पासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सहभाग असलेल्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जय महाराष्ट्र, दिलखुलास, मी मुख्यमंत्री बोलतोय व कार्यक्रमाचा महिन्याचा खर्च 20 लाख रुपये असा बारा महिन्यांचा खर्च 2 कोटी 40 लाख रुपये, कार्यक्रमाचे दूरदर्शनवरून प्रसारणाचा खर्च वर्षाचा 90 लाख, तसेच राज्यातील अ वर्ग वृत्तपत्रातून दिली जाणारी प्रसिद्धी यापोटी येणारा खर्च 1 कोटी 96 लाख 12 हजार 800 रुपये इतका येणार आहे. असे एकूण सुमारे साडेचार कोटी रुपये जाहिरातीवर वर्षभर खर्च केले जाणार आहेत.

Web Title: mumbai maharashtra news 4.5 crore expenditure on mi mukhyamantri bolatoy