पाच लाख मुले दोन वर्षांत नापास

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 जून 2017

नोंदणी केलेली 14 हजार 248 मुले परीक्षेपासून दूर

नोंदणी केलेली 14 हजार 248 मुले परीक्षेपासून दूर
मुंबई - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेत निकालाची टक्‍केवारी वाढल्याबद्दल चर्चा होत असली तरी मागील दोन वर्षांत तब्बल चार लाख 98 हजार 639 मुले नापास झाली आहेत, तर ज्या मुलांनी याच परीक्षेला बसण्यासाठी नोंदणी केली; परंतु ते परीक्षेपर्यंत पोहोचलेच नाहीत, अशा मुलांची संख्याही दोन वर्षांत तब्बल 14 हजार 248 इतकी असून, यात सर्वाधिक संख्या शहरी भागात असल्याची माहिती आज जाहीर झालेल्या दहावीच्या निकालातून समोर आली आहे.

मार्च 2016 मध्ये दहावीच्या परीक्षेला बसलेल्या एकूण 17 लाख 26 हजार 52 विद्यार्थ्यांपैकी दोन लाख 40 हजार 588 विद्यार्थी नापास झाले होते. यंदाच्या परीक्षेला एकूण 17 लाख 64 हजार 536 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी दोन लाख 58 हजार 51 विद्यार्थी असे दोन वर्षांत चार लाख 98 हजार 639 मुले झाली नापास झाली आहेत.

शिक्षण मंडळाने आज जाहीर केलेल्या दहावीच्या निकालाच्या आकडेवारीच्या सर्वसाधारण माहितीतून ही बाब समोर आली आहे. जी मुले दहावीच्या परीक्षेत नापास होतात, त्यांची आकडेवारी शिक्षण मंडळाकडे असते; मात्र जे दहावीच्या वर्गात राहूनही परीक्षेला बसलेले नाहीत, त्यांचे पुढे काय झाले, याची कोणतीही माहिती मंडळाकडे उपलब्ध नसते. मागील वर्षी मार्च 2016 मध्ये जाहीर झालेल्या दहावीच्या निकालानंतर तब्बल दोन लाख 40 हजार 588 विद्यार्थी नापास झाले होते; तर नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी सहा हजार 852 विद्यार्थ्यांनी परीक्षाच दिली नव्हती. त्यात या वर्षी वाढ झाली असून, नोंदणी करूनही तब्बल सात हजार 396 विद्यार्थी परीक्षेला बसले नाहीत. ही संख्या राज्यातील शहरी भागात सर्वाधिक असल्याचेही दिसून आले आहे. यात मुंबई विभाग आघाडीवर आहे. या विभागात या वर्षी परीक्षेला नोंदणी केलेल्या एकूण तीन लाख 43 हजार 991 विद्यार्थ्यांपैकी एक हजार 18 मुलांनी परीक्षेकडे पाठ दाखवली आहे, तर दुसरीकडे पुणे विभागातून 955 विद्यार्थ्यांनी तर लातूर विभागातून 798 विद्यार्थी परीक्षेला गेलेच नाहीत. याउलट स्थिती कोकण विभागात असून, येथे केवळ 15 विद्यार्थीच नोंदणी करून परीक्षेला हजर राहू शकले नाहीत.

Web Title: mumbai maharashtra news 5 lakh student fain in 2 year