कर्जमाफीची रक्‍कम द्या; अन्यथा आंदोलन - तटकरे

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 5 सप्टेंबर 2017

मुंबई - राज्यभरात कर्जमाफीसाठी 42 लाख शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज भरले असतील तर आता सरकार कशाची वाट पाहत आहे. ज्या शेतकऱ्यांनी अर्ज भरले आहेत, त्यांच्या बॅंक खात्यावर कर्जमाफीची रक्‍कम जमा करा, असे आवाहन करत, 1 ऑक्‍टोबरपर्यंत सरकारने जाहीर केलेल्या सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्‍कम मिळाली नाही तर राष्ट्रवादी राज्यव्यापी आंदोलन करेल, असा इशारा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज दिला. राष्ट्रवादी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ऑनलाइन अर्जांपैकी किती शेतकरी कर्जमाफीस पात्र आहेत, त्यांची संख्या सरकारने तातडीने जाहीर करावी. सरकारने कर्जमाफीची फसवी घोषणा करून आता शेतकऱ्यांना रांगेत उभे राहून ऑनलाइन अर्ज भरण्याची केलेली सक्‍ती म्हणजे वेळकाढूपणा असल्याची टीका तटकरे यांनी केली. ते म्हणाले की, " हे सरकार पूर्णतः सत्तेत मशगूल झाले असून, सरकारचे ना मुंबईकडे लक्ष आहे, ना अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांकडे, ना राज्यातील गणेश भक्तांकडे. या सरकारने घोषणा तर भरमसाट केल्या; मात्र कृतीमध्ये कोणतीच गोष्ट आणली नाही.
राष्ट्रवादी 250 मतदारसंघांत बांधणी करणार आगामी विधानसभा निवडणुकांची तयारी म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेस 250 मतदार संघात निरीक्षक नेमणार असल्याची माहिती सुनील तटकरे यांनी दिली. या निरीक्षकांच्या माध्यमातून प्रत्येक बुथस्तरावर पक्षाचे संघठन मजबूत करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करत आगामी विधानसभा निवडणुकांत राष्ट्रवादी स्वबळावर लढणार असल्याचे सुतोवाच तटकरे यांनी केले.

Web Title: mumbai maharashtra news agitation for loan waiver amount