पीकविमा मुदतवाढीसाठी विरोधकांचा सभात्याग

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

सरकारकडून ठोस निवेदनाची अपेक्षा; केंद्राकडे मागणी केल्याचे सरकारचे स्पष्टीकरण

 

मुंबई - पंतप्रधान पीकविमा योजनेला मुदतवाढ देण्याबाबत सोमवारी रात्री 9 वाजेपर्यंत विधान परिषदेत सरकारने निवेदन न केल्याने विरोधकांनी सरकारच्या विरोधात घोषणा देत सभात्याग केला.

सरकारकडून ठोस निवेदनाची अपेक्षा; केंद्राकडे मागणी केल्याचे सरकारचे स्पष्टीकरण

 

मुंबई - पंतप्रधान पीकविमा योजनेला मुदतवाढ देण्याबाबत सोमवारी रात्री 9 वाजेपर्यंत विधान परिषदेत सरकारने निवेदन न केल्याने विरोधकांनी सरकारच्या विरोधात घोषणा देत सभात्याग केला.

पीकविमा योजनेला मुदतवाढ देण्यासंदर्भात केंद्र सरकारने हात वर केले असल्याचा मुद्दा विरोधी पक्षांच्या सदस्यांनी उपस्थित केला होता. या योजनेसाठी विमा कंपन्यांची निवड राज्य सरकारने केली असल्याने या संदर्भातील निर्णय राज्यानेच घ्यावा, असे केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी स्पष्ट केले आहे. आता हा चेंडू राज्य सरकारच्या कोर्टात आहे, अशी भूमिका या सदस्यांनी मांडली. त्यावर कृषिमंत्री फुंडकर म्हणाले, की पीकविमा योजनेचे अर्ज भरून घेण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ द्यावी, अशी मागणी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे केली आहे. त्याबाबतचा प्रस्ताव राज्याने केंद्राकडे पाठवला आहे. केंद्रीय कृषिमंत्र्यांशी दूरध्वनीवरून बोलणे झाले आहे. मुदतवाढ देण्याबाबत त्यांनी सकारात्मकता दर्शवली आहे.

या विषयावर विधान परिषदेतील कामकाज दिवसभरात तीन वेळा तहकूब करण्यात आले. हाच मुद्दा पकडून विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारला धारेवर धरले. ते म्हणाले, ""मराठवाड्यात यंदा गेल्या वर्षीपेक्षा कमी पाऊस झाला आहे, त्यामुळे शेतकरी पीकविम्यासाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज करीत आहेत. या योजनेची मुदत संपली असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यातच राज्य सरकारने ऑनलाइन अर्ज भरण्याची सक्ती केली आहे, त्यामुळे ही सर्व परिस्थिती निर्माण झाली आहे.'' जामखेडला शेतकऱ्यांवर लाठीमार करण्यात आला. राज्य सरकारला शेतकऱ्याची जात मारायची आहे का, असा उद्विग्न सवाल त्यांनी केला. तसेच, 31 जुलैची मुदत वाढवून द्यावी, अन्यथा सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. या वेळी सभागृहनेते चंद्रकांत पाटील यांनी केंद्र सरकारशी संपर्क साधत असल्याचे सांगितले. कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ मिळेल, असे ते म्हणाले; मात्र सरकारवर जोरदार हल्ला चढवत विरोधकांनी सभात्याग केला.

मृत शेतकऱ्याच्या कुटुंबाला मदत
'मंचक इंगळे हा शेतकरी अर्ज भरण्यासाठी बॅंकांकडे चकरा मारत असताना त्याचा अपघाती मृत्यू झाला. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांना मदत देण्यात यावी, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली. भोकर येथे दवाखान्यात नेत असताना मृत्यू पावलेल्या रामा पोत्रे या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत देण्यात येणार असल्याचे फुंडकर यांनी सांगितले. मात्र, मंचक इंगळे हा आंबेजोगाईचा शेतकरी दुचाकीच्या अपघातात मृत झाला आहे, त्याची चौकशी करून मदत देण्याचा निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी जाहीर केले.

हे अर्ज ऑनलाइन भरण्यासाठी राज्य सरकारच्या सर्व्हरची ताकद तरी आहे का, त्यामुळे कोल्हापूरसारख्या जिल्ह्यात फक्त सात अर्ज भरण्यात आले आहेत.
- जयंत पाटील, शेतकरी कामगार पक्ष

या परिस्थितीला संपूर्णपणे राज्य सरकार जबाबदार आहे. शेवटच्या दिवसापर्यंत वाट का पाहता? सगळेजण चोर, फसवणूक करीत आहेत, असे गृहीत धरून सरकारचे कामकाज चालले आहे. ऑनलाइन अर्ज घ्यायचे होते, तर आधीपासूनच व्यवस्था करणे आवश्‍यक होते. बॅंकेबाहेर उभ्या असलेल्या शेतकऱ्यांना टोकन द्यावे. अर्ज भरून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी किती दिवस वाट पाहायची?
- सुनील तटकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस

बॅंकेच्या एकेका शाखेत दिवसाला 32 ते 35 अर्ज भरून घेतले जात आहेत. यंत्रणा सदोष आहे. त्यामुळे एक कोटी शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार आहेत.
- भाई जगताप, कॉंग्रेस

पीकविमा योजनेसाठी ऑफलाइन अर्ज स्वीकारण्याचा निर्णय घ्यावा.
- नीलम गोऱ्हे, शिवसेना

Web Title: mumbai maharashtra news agriculture insurance time period increase