कृषिपंप वीजबिलांची दुरुस्ती होणार

किरण कारंडे 
बुधवार, 28 मार्च 2018

मुंबई - राज्यातील 41 लाख कृषिपंपांची वीजबिले दुरुस्त करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वीजदराबाबत भेटलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या बैठकीत दिले. "सकाळ'ने महावितरणची बनवाबनवी उघड केली होती. "आयआयटी' मुंबईने दिलेल्या अहवालाच्या आधारे हा निर्णय झाला आहे. शेतकऱ्यांच्या वीजदराच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. राज्यातील शेतकऱ्यांची वीजबिले 15 ऑगस्टपर्यंत दुरुस्त करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत शिष्टमंडळाला दिले.

मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आयआयटी मुंबईचा कृषिपंप वीज वापर पडताळणीचा अहवाल मिळाला आहे, अशी कबुली दिली. महावितरणने वीजबिले फुगवून दिली हेही ऊर्जामंत्र्यांनी मान्य केले. त्यामुळेच सर्व वीजबिले येत्या तीन ते चार महिन्यांत तपासून देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. खुद्द मुख्यमंत्र्यांनीही महावितरणच्या वीजबिलाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ""महावितरणने वाढवून दिलेली वीजबिले दुरुस्त करण्यात येतील. वीजबिले तपासल्यावर महावितरणची बदमाशी बाहेर पडेलच. शिवाय अंशदानाचे वाचणारे पैसे शेतकऱ्यांना सवलतीच्या रूपात मिळतील,'' असेही मुख्यमंत्र्यांनी या वेळी स्पष्ट केले.

शिष्टमंडळात एन. डी. पाटील, प्रताप होगाडे, बाबासाहेब पाटील भुयेकर, आर. जी. तांबे, विक्रांत पाटील, अरुण लाड आदी विविध संघटनांचे पदाधिकारी, तसेच आमदार चंद्रजित नरके, बंटी सतेज पाटील, प्रकाश आबिटकर, सुजित मिणचेकर, उल्हास पाटील, अमल महाडिक, सुरेश हळवणकर, गणपतराव देशमुख आदी उपस्थित होते. याशिवाय चंद्रकांत पाटील, ऊर्जा सचिव अरविंद सिंह, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार आदीही उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या विजेच्या मुद्द्यावर आज राज्यातून दहा हजार शेतकरी मुंबईत आंदोलनाच्या निमित्ताने दाखल झाले होते. त्यामध्ये बहुतांश शेतकरी हे कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर, उस्मानाबाद, बुलडाणा आदी भागातून होते.

नव्या सवलत दरासाठी बैठक
राज्यातील शेतकऱ्यांसाठी नवा विजेचा सवलतीचा दर ठरवण्यासाठी एप्रिलमध्ये बैठक घेण्यात येईल, अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिष्टमंडळाला दिली. शिवाय उपसा सिंचन योजनांना 1.16 रुपये प्रतियुनिटने वीजदर आकारणी करण्यात येईल. तसेच यापूर्वीचा सवलतीचा दर ऑगस्टपर्यंत परताव्याच्या रूपात देण्यात येणार असल्याचे आश्वासन या वेळी देण्यात आले.

Web Title: mumbai maharashtra news agriculture pump electricity bill repairing