हवेवर आलेले सरकार हवेत विरून जाईल - अशोक चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

मुंबई - राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा करूनही राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाहीत. गेल्या सात दिवसांत 34 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, यावरून हे सरकार शेतकरी आत्महत्यांबाबत गंभीर नाही, हे स्पष्ट झाले आहे. हवेवर आलेले आणि हवेत असलेले हे सरकार कधी हवेत विरून जाईल हे कळणारही नाही, अशी टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे.

टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलताना चव्हाण म्हणाले की, कर्जमाफीची घोषणा केल्यानंतरही शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या नाहीत यावरून शेतकऱ्यांचा या सरकारवर विश्वास नाही, हे स्पष्ट झाले आहे. सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी म्हणून प्रयत्न करते आहे की, कर्जमाफीचा लाभ मिळू नये म्हणून जाचक अटी व शर्ती घालत आहे? या सरकारचा कारभार पाहता हे सरकार शेतकऱ्यांच्या जिवावर उठले आहे, असे चव्हाण म्हणाले.

विरोधी पक्ष, सुकाणू समितींवर मुख्यमंत्र्यांकडून ज्या भाषेत टीका होते त्यातून सत्तेचा अहंकार दिसून येतो. त्यातही तीन महिने झाले तरी मुख्यमंत्र्यांना संघर्ष यात्रेवर टीका करावी लागते यातच सर्व काही आले. गेली अडीच वर्षे कर्जमाफी देणार नाही, असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांना संघर्षयात्रेमुळेच कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागला. फडणवीसांच्या काळात इतिहासात पहिल्यांदाच शेतकऱ्यांना संप करावा लागला. संघर्ष यात्रेचे यश संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. भाजपच्या "शिवार संवाद' यात्रेला किती लोक होते? आणि लोकांनी कसा प्रतिसाद दिला ते मुख्यमंत्र्यांनी जनतेला सांगावे, असे आवाहन चव्हाण यांनी दिले.

कॉंग्रेस पक्षाने कर्जमाफीचे खोटे आकडे आणि सरकारचा शेतकरी विरोधी चेहरा जनतेसमोर उघडा पाडल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा त्रागा सुरू आहे. अजूनही वेळ गेली नाही. शेतकऱ्यांची फसवणूक करू नका, शेतकऱ्यांना न्याय द्या; अन्यथा शेतकरी तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

Web Title: mumbai maharashtra news ashok chavan talking