विधिमंडळात भाजपवर तुटून पडा - उद्धव ठाकरे

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 8 जुलै 2017

वादग्रस्त मेसेज केल्याचे स्वाती साठे यांनी अद्याप नाकारलेले नाही. त्यांनी असे मेसेज करणे खेदजनक आहे. न्यायाची अपेक्षा असणाऱ्यांनी आरोपीची बाजू घेणे चुकीचे. गृहमंत्री असलेल्या मुख्यमंत्र्यांनी याबाबत बोलावे. न्यायालयीन चौकशीची आमची मागणी आहेच. ज्यांना आम्ही नायक समजतो त्यांनी खलनायक बनू नये.
- नीलम गोऱ्हे, शिवसेनेच्या उपनेत्या, प्रवक्‍त्या

मुंबई - येत्या पावसाळी अधिवेशनात भाजपवर तुटून पडण्याचे आदेश शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या आमदारांना आज दिले. शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा व्हावी, मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरील शेतकऱ्यांना न्याय मिळावा, यासाठी पावसाळी अधिवेशनात सरकारला घेरण्याची रणनीती शुक्रवारी शिवसेना मंत्र्यांच्या उपस्थितीत "मातोश्री'वर झालेल्या बैठकीत निश्‍चित झाल्याचे समजते.

ठाकरे यांच्या उपस्थिती "मातोश्री'वर शिवसेनेचे मंत्री आणि आमदारांची बैठक पार पडली. पावसाळी अधिवेशनात राज्यातील कोणते प्रश्न घ्यायचे याबाबत चर्चा झाली. शेतकऱ्यांची कर्जमाफी, मुंबई महापालिकेतील कारभारावर भाजपकडून टीका होण्याची शक्‍यता आणि समृद्धी महमार्गावरील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याच्या महत्त्वाच्या मुद्यांवर या वेळी चर्चा झाल्याचे समजते.

मुंबई महापालिकेतील कारभारावरून टीका झाल्यास भाजप आमदारांना जशास तसे उत्तर देण्याचे आदेश ठाकरे यांनी शिवसेनेच्या आमदारांना दिले. राज्य सरकारने कर्जमाफी जाहीर केली असली, तरी अजूनही शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. त्यामुळे या प्रश्नावरून आवाज उठविण्याचे या वेळी ठरविण्यात आले.

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी जात असताना त्याचा योग्य मोबदला मिळत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. त्यामुळे या मुद्यावरून सरकारला घेरताना विरोधकांची कशी कोंडी करायची याबाबतही चर्चा झाल्याचे कळते.

शिवसेनेच्या उपनेत्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी अधिवेशनात मांडायच्या राज्यातील प्रश्‍नांबाबत चर्चा झाल्याचे सांगितले. ""शेतकरी कर्जमाफी, मुंबईची सुरक्षा, अशा विविध विषयांबाबत ठाकरे यांनी मार्गदर्शन केले.''

Web Title: mumbai maharashtra news attack on bjp In legislature by shivsena