भिराचा पारा संशयास्पद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 मार्च 2018

मुंबई - उच्चांकी तापमानामुळे चर्चेत असलेल्या रायगड जिल्ह्यातील भिरा येथील नोंदीबाबत हवामान खात्याला संशय वाटत आहे. त्यामुळे पुणे वेधशाळेने तेथील तापमान नोंदवण्यास 22 मार्चपासून बंद केले आहे.

मुंबई - उच्चांकी तापमानामुळे चर्चेत असलेल्या रायगड जिल्ह्यातील भिरा येथील नोंदीबाबत हवामान खात्याला संशय वाटत आहे. त्यामुळे पुणे वेधशाळेने तेथील तापमान नोंदवण्यास 22 मार्चपासून बंद केले आहे.

वर्षभरापासून भिरा येथे सरासरीपेक्षा पाच ते सहा अंश अधिक तापमानाची नोंद होते. गेल्या वर्षी मार्च महिन्यात तेथील कमाल तापमान 46.5 अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते. सोमवारीही (ता. 26) तेथे देशातील सर्वाधिक कमाल तापमानाची (45 अंश सेल्सियस) नोंद झाली होती. भिरा येथील तापमानाची नोंद नजीकच्या हवामान केंद्रातील नोंदीशी जुळत नसल्याने तेथील तापमानाची योग्य पद्धतीने नोंद व्हावी, असे मत हवामानतज्ज्ञ व्यक्त करत होते. काही दिवसांपासून भिरा येथील कमाल तापमान सातत्याने 40 ते 42 अंश सेल्सिअस नोंदवले जात आहे.

भिरा येथे नोंदवले जाणारे तापमान संशयास्पद वाटत असल्याने सध्या परिसरात दोन ठिकाणी तापमानाची नोंद करण्यात येत आहे. सध्या तापमानाची नोंद होणाऱ्या तेथील केंद्रापासून दीड किलोमीटर अंतरावर दुसरे केंद्र उभारले गेले आहे. तेथेही तापमानाची नोंद करण्यात येत आहे; मात्र दोन्ही केंद्रांवरील माहिती किमान वर्षभर प्रसिद्ध केली जाणार नाही. दोन्ही केंद्रांतील नोंदीच्या तुलनेनंतरच भिरा येथे नोंदवलेले तापमान योग्य आहे का हे समजू शकेल. त्या नोंदी जुळत असल्यास तेथील तापमानवाढीचे नेमके कारण समजू शकेल, अशी माहिती पुणे वेधशाळेचे क्‍लायमेट रिसर्च अँड सर्व्हिसेसचे प्रमुख डॉ. अभय सहाय यांनी दिली.

भिरा तसेच त्यानजीकच्या केंद्रांवर नोंदवल्या जाणाऱ्या तापमानात विसंगती आढळते. त्यामागील कारण स्पष्ट होत नसल्याने भिरा येथे नोंदवले जाणारे तापमान किमान वर्षभर गृहीत धरले जाणार नाही.
- डॉ. अभय सहाय, प्रमुख, क्‍लायमेट रिसर्च अँड सव्हिसेस, पुणे वेधशाळा

Web Title: mumbai maharashtra news bhira temperature