मुंबईत उभारणार बॉलिवूड संग्रहालय

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 22 मार्च 2018

राजेश खन्ना, अमिताभपासून विविध कलाकारांच्या इतिहासाला मिळणार उजाळा

राजेश खन्ना, अमिताभपासून विविध कलाकारांच्या इतिहासाला मिळणार उजाळा
मुंबई - मुंबईतील बॉलिवूड हे देशासह जगभरातील चित्रपटप्रेमी आणि पर्यटकांसाठी मोठे आकर्षणकेंद्र आहे. हे लक्षात घेऊन याला पर्यटनाचे आकर्षण केंद्र बनविण्याच्या दृष्टीने भव्य बॉलिवूड संग्रहालय उभे केले जाईल. यासाठी वांद्रे व जुहू परिसरात जागा मिळण्यासाठी मुंबईच्या विकास आराखड्यात आवश्‍यक ते बदल करण्याबाबत मागणी करू, असे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी आज विधानसभेत सांगितले.

पर्यटन विषयाच्या अनुषंगाने नियम 293 अन्वये विधानसभेत चर्चा झाली. या चर्चेला काल रात्री उशिरा उत्तर देताना रावल बोलत होते. चर्चेत विधानसभेतील अनेक सदस्यांनी सहभाग घेत महाराष्ट्राच्या पर्यटन विकासाच्या दृष्टीने विविध सूचना मांडल्या. मंत्री रावल यांनी या सर्व सूचना लक्षात घेऊन काल विधानसभेत उत्तर दिले.

या वेळी रावल म्हणाले, मंबईत असलेल्या बॉलिवूडला मोठा इतिहास आहे. हा इतिहास उजागर हेण्याच्या दृष्टीने तसेच देश विदेशातील पर्यटकांना मुंबईत आणखी एक टुरिस्ट ऍट्रॅक्‍शन निर्माण करण्याच्या दृष्टीने पर्यटन विभागामार्फत हे संग्रहालय उभारण्यात येईल. यात चित्रपटसृष्टीच्या निर्मितीपासून त्याच्या सुवर्णकाळापर्यंतचा सर्व कालावधी दर्शविण्यात येईल. अगदी सुरवातीच्या अभिनेत्यांपासून राजेश खन्ना, अमिताभ बच्चन ते आजपर्यंतच्या अभिनेते, अभिनेत्री, लता, रफी, किशोर यांच्यापासून चित्रपटसृष्टीला वैभवशाली बनविण्यात योगदान दिलेल्या सर्व कलाकार, तंत्रज्ञांचा इतिहास या संग्रहालयात असेल. जुन्या काळातील वेशभूषा, पोस्टर्स, चित्रीकरणाचे साहित्य, कलासेट, फोटोगॅलरी, कॅमेरे अशा सर्वांचा या संग्रहालयात समावेश असेल.

Web Title: mumbai maharashtra news bollywood musium