बुलेट ट्रेन व कर्जमाफी फसवी..! - शरद पवार

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 4 ऑक्टोबर 2017

मुंबई - नोटाबंदी व जीएसटीसारख्या लागोपाठच्या निर्णयाने देशात महागाई, मंदी व बेरोजगारी वाढत असून, देशाच्या आर्थिक वृद्धी दरातली वाढती घट ही चिंताजनक आहे. त्यातच केंद्राची बुलेट ट्रेन व राज्य सरकारची कर्जमाफी निव्वळ फसवी असून, लोकांना मोठी दिवास्वप्न दाखवण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न असल्याची चौफेर टीका माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी केली.

राष्ट्रवादी भवनात राज्य कार्यकारिणी बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. या वेळी त्यांनी मोदी व फडणवीस सरकारच्या धोरणांवर जोरदार नाराजी व्यक्‍त केली. जपानमध्ये आर्थिक मंदी असून, त्यांची मंदी दूर करण्यासाठीच सरकारने बुलेट ट्रेनचा घाट घातल्याचा टोलाही पवार यांनी लगावला. राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. मात्र, अंमलबजावणीच्या तारखा दोनदा पुढे ढकलण्यात आल्या. आता दिवाळीपूर्वी सरकार शेतकऱ्यांना कर्ज देणार असल्याचे सांगत आहे. दिवाळीपूर्वी ही कर्जमाफी मिळाली नाही तर 5 नोव्हेंबर नंतर "राष्ट्रवादी' राज्यव्यापी आंदोलन छेडेल, असा इशारा पवार यांनी दिला. सरकारविरोधी या संघर्षात मी स्वत: सहभागी होणार असल्याचेही ते म्हणाले.

बुलेट ट्रेनबाबत बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्रात बुलेट ट्रेनची केवळ तीन स्थानके राहणार आहेत. केवळ 35 मिनिटांचा प्रवास महाराष्ट्रातून असेल. तरीही राज्य सरकारने गुजरातप्रमाणे 30 हजार कोटी रुपयांचा निधी दिला आहे. महाराष्ट्राचा हा निधीतला अर्धा वाटा लाभदायक नाही. देशात नव्या उद्योगांना पोषक वातावरण नसल्याने नवी गुंतवणूक थांबली आहे; तर जुने उद्योग मंदीच्या सावटात असल्याने उत्पादन व बेरोजगारी वाढत असल्याचे स्पष्ट करत पवार यांनी बेरोजगारीची आकडेवारी दिली. पुढील काही महिन्यांत अनेक कंपन्यांमधून युवकांना बेरोजगार होण्याचा धोका असल्याचेही ते म्हणाले.

दहशतीचा प्रयत्न ...
दरम्यान, सोशल मीडियात सरकारविरोधी लिहिणाऱ्या तरुणांना राज्य सरकार नोटीस पाठवत असल्याबाबत पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्‍त केली. अभिव्यक्‍ती स्वातंत्र्यावर हा हल्ला असून, युवकांवर दहशत बसवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप पवार यांनी केला. या वेळी काही तरुणांना आलेल्या नोटिसा त्यांनी वाचून दाखवल्या.

राणे यांच्यावर "प्रहार'
कॉंग्रेसला सोडचिठ्‌ठी देत नारायण राणे यांनी स्वत:चा पक्ष काढल्याबाबत बोलताना पवार म्हणाले की, राणे यांना शिवसेना व कॉंग्रेसमध्ये संधी मिळाली होती. मात्र, आता नवीन पक्ष स्थापन करताना कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेतील आमदार संपर्कात असल्याचा केलेला दावा हास्यास्पद आहे. "पक्ष स्थापन करताना राणे स्वत:च्या आमदार पुत्रालादेखील पक्षात घेऊ शकले नाहीत,' असा प्रहारच त्यांनी या वेळी केला.

पवार यांचे टीकास्त्र...
. जपानची मंदी दूर करण्याचा प्रयत्न
. महाराष्ट्राचा फायदा नसताना निधीची तरतूद
. देशातलं वातावरण भाजपविरोधी
. बेरोजगारी, महागाई व मंदीचे देशावर सावट
. उद्योजकांमधे प्रचंड नाराजी व धास्ती

Web Title: mumbai maharashtra news Bullet train and debt waiver fraud