केंद्राचे काम फक्‍त जाहिरातीपुरतेच! - सचिन पायलट

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 10 जून 2017

मुंबई - देशातल्या जनतेला विकासाची स्वप्न दाखवून सत्तेत आलेल्या मोदी सरकारने तीन वर्षांत केवळ भावनिक राजकारण केल्याने देश अनेक क्षेत्रांत पिछाडीवर पडला असून, मोदी सरकारचे काम केवळ जाहिरातीपुरतेच मर्यादित असल्याचे टीकास्त्र कॉंग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री सचिन पायलट यांनी आज सोडले. मोदी सरकारच्या तीन वर्षांच्या कार्यकाळाचा लेखाजोखा घेण्यासाठी आज राजीव गांधी भवन येथे त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी मोदी सरकारच्या तीन वर्षांतील कामे आणि घोषणांची त्यांनी चिरफाड केली.

मागील तीन वर्षांत केंद्र सरकार सर्वच क्षेत्रात अपयशी ठरले असून, एकही ठसठसीत काम या सरकारला करता आले नाही. मात्र हे अपयश झाकण्यासाठी मोदी सरकारने 900 शहरांत तब्बल 2200 कोटी रुपयांच्या खर्च करून जाहिरात बाजी केल्याचा आरोप पायलट यांनी केला.

सत्तेत येण्यापूर्वी भाजपने शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या 50 टक्के अधिक हमीभाव देण्याची घोषणा केली होती. पण सत्तेत आल्यावर आता हमीभाव मागणाऱ्या शेतकऱ्यांना गोळ्या झाडून ठार केले जात आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

मागील तीन वर्षांत कॉंग्रेस सरकारने सुरू केलेल्या कामांची उद्‌घाटने करून मोदी सरकारने जाहिरातबाजीशिवाय काहीच केले नाही. देशात शेतकरी, दलित, अल्पसंख्याक, महिलांवरील अत्याचारांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सर्व समाज घटकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. मात्र देश किती प्रगती करतो आहे, अशा प्रकारची जाहिरातबाजी करून मोदी सरकार दिशाभूल करत असल्याचा टोला पायलट यांनी लगावला.

महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थानमध्ये शेतकरी मोठ्या संकटात आहे. तो रस्त्यावर उतरून हमीभाव आणि कर्जमाफीची मागणी करतोय. त्यांच्याशी संवाद साधण्याऐवजी पोलिसांकरवी गोळ्या घालून कष्टकरी अन्नदात्याला ठार मारले जात आहे. हमीभाव मागणाऱ्या शेतकऱ्यांना गोळ्या घालणारे मोदी सरकार आहे, अशा शब्दांत पायलट यांनी संताप व्यक्‍त केला.

भाजप सरकारने उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली, पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी का नाही, असा सवाल पायलट यांनी केला.

शिवसेनेला सत्तेची लालसा
शिवसेना दिल्लीत वेगळे बोलते आणि मुंबईत वेगळे बोलते. आपण सत्तेत आहोत की विरोधात हे शिवसेनेने ठरवावे, असा टोला लगावत पायलट म्हणाले, की शेतकऱ्यांबद्दल एवढीच तळमळ असेल, तर शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडावे. पण शिवसेना सत्तेसाठी हापलेली आहे. सत्तेची लालसा शिवसेनेला सत्ता सोडू देत नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

Web Title: mumbai maharashtra news central work only advertise