क्रांतिकारी निर्णयांमुळे महाराष्ट्रात परिवर्तन पर्व - फडणवीस

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 29 सप्टेंबर 2017

मुंबई - 'कृषी, सिंचन, उद्योग, पायाभूत सुविधा आदी क्षेत्रांत सरकारने घेतलेल्या क्रांतिकारी निर्णयांमुळे महाराष्ट्रात अनोखे परिवर्तन पर्व सुरू झाले आहे. "सबका साथ-सबका विकास' या सूत्रानुसार सुरू असलेला राज्याचा विकास सर्वसमावेशक आहे,'' असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी सिंगापूर येथे सांगितले.

मुंबई - 'कृषी, सिंचन, उद्योग, पायाभूत सुविधा आदी क्षेत्रांत सरकारने घेतलेल्या क्रांतिकारी निर्णयांमुळे महाराष्ट्रात अनोखे परिवर्तन पर्व सुरू झाले आहे. "सबका साथ-सबका विकास' या सूत्रानुसार सुरू असलेला राज्याचा विकास सर्वसमावेशक आहे,'' असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी सिंगापूर येथे सांगितले.

दक्षिण कोरियातील विविध भेटी, उद्योगसमूहांशी चर्चा आणि सामंजस्य करार असा दौरा आटोपल्यानंतर फडणवीस आज सकाळी सिंगापूर येथे दाखल झाले. सिंगापूर येथील "इन्स्टिट्यूट ऑफ साऊथ एशिया स्टडीज' (आयएसएएस), "नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर' (एनयूएस) आणि "सीआयआय' यांच्या वतीने आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. "इन्स्टिट्यूट ऑफ साऊथ एशिया स्टडीज'चे अध्यक्ष आणि राजदूत गोपीनाथ पिल्लई या वेळी उपस्थित होते.

यापूर्वी अनेक राज्यांतील मुख्यमंत्र्यांनी आपल्या राज्याच्या प्रगतीबाबत या व्याख्यानमालेतून माहिती दिल्याचा उल्लेख करून फडणवीस म्हणाले, की आमच्यासाठी "सबका साथ-सबका विकास' हाच विकासाचा मूलभूत मंत्र असून त्याद्वारे महाराष्ट्राचा सर्वसमावेशक विकास सुरू आहे. "ईज ऑफ डुईंग बिझनेस'द्वारे राज्य सरकारने उद्योग क्षेत्रात सुधारणांची मोठी प्रक्रिया हाती घेतली आहे. त्यामुळे उद्योगांसाठी जमीन मिळवण्यासह विविध परवानग्या कमी वेळेत आणि एकाच ठिकाणी मिळवणे शक्‍य झाले आहे. यापूर्वी एक हॉटेल सुरू करण्यासाठी 176 परवानग्या घ्याव्या लागत होत्या. मात्र, आता ही संख्या 25 एवढी कमी करण्यात आली असून त्याही ऑनलाइन मिळत आहेत. या सर्व प्रयत्नांचा परिणाम म्हणून देशातील एकूण परकीय गुंतवणुकीच्या 50 टक्‍क्‍यांहून अधिक गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे, अशी माहितीही फडणवीस यांनी दिली.

कंपन्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा
सिंगापूर येथील भारतीय उच्चायुक्तालयाच्या वतीने विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत आयोजित राउंड टेबल चर्चेलाही मुख्यमंत्री उपस्थित होते. सिंगापूरमधील आघाडीच्या कंपन्या आणि विशेषतः महाराष्ट्रात विस्तार असलेल्या कंपन्यांच्या प्रतिनिधींशी विविध विषयांवर त्यांनी संवाद साधला. राज्यातील गुंतवणूक आणि विस्ताराच्या संधींची माहितीही मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिली. जगात सर्वोत्कृष्ट असलेल्या चांगी विमानतळाला महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाने भेट दिली.

Web Title: mumbai maharashtra news devendra fadnavis talking