वळसे हे विधानसभा समृद्ध करणारे नेते

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 28 ऑक्टोबर 2017

मुंबई - "राजकारणात जे सद्‌गुण असायला हवेत, ते सर्व गुण असणारा नेता म्हणजे माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील होय. विधानसभा अध्यक्ष असताना त्यांच्या लोकशाही निर्णयामुळे विधानसभा समृद्ध करणाऱ्या नेत्यांच्या रांगेत त्यांचे स्थान आहे,' अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वळसे पाटील यांच्याबाबत भावना व्यक्‍त केल्या.

मुंबई - "राजकारणात जे सद्‌गुण असायला हवेत, ते सर्व गुण असणारा नेता म्हणजे माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील होय. विधानसभा अध्यक्ष असताना त्यांच्या लोकशाही निर्णयामुळे विधानसभा समृद्ध करणाऱ्या नेत्यांच्या रांगेत त्यांचे स्थान आहे,' अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वळसे पाटील यांच्याबाबत भावना व्यक्‍त केल्या.

रवींद्र नाट्यमंदिरच्या सभागृहात आज वळसे पाटील यांच्या एकसष्ठीचा दिमाखदार सोहळा पार पडला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रामदास आठवले यांच्यासह सर्व पक्षांतील प्रमुख नेते, आजी-माजी मंत्री, आमदार-खासदार यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

दिलीपराव म्हणजे सद्‌गुणी व प्रामाणिक नेतृत्व असल्याचे फडणवीस म्हणाले. राज्याला भारनियमनातून मुक्‍त करण्यासाठी ऊर्जामंत्री म्हणून त्यांनी दिलेले योगदान कधीही विसरता येणार नाही. त्यासोबतच खासगी विद्यापीठांचा कायदा यासारख्या अनेक क्रांतिकारी सुधारणा वळसे पाटील यांनी मंत्रिपदाच्या काळात केल्याचे फडणवीस म्हणाले.

"राजकारणात दिलेली जबाबदारी पार पाडताना स्वत:चा ठसा उमटवण्यासाठी आग्रही राहताना संपूर्ण राज्याला लाभ होईल, अशा योजना राबविण्यात वळसे पाटील यांचा हातखंडा होता,' अशा शब्दांत शरद पवार यांनी कौतुक केले. अत्यंत मितभाषी, राजकीय टीका केली तरी व्यक्तिगत संबंध कधीही कटू होणार नाहीत, याची सतत काळजी घेणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख कायम असल्याचे ते म्हणाले.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले, महाराष्ट्राचे प्रश्न सोडवण्याची वळसे पाटील यांची हातोटी व कौशल्य आहे. पवारांनी नव्या पिढीला घडवण्याचे काम केले. दिलीपरावांना दिलेल्या संधीचे सोने त्यांनी केले. एक उत्तम संसदपटू व लोकशाहीची परंपरा बाळगत राजकारण करणारा सहकारी म्हणून त्यांचे स्थान अढळ असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले.
राजकारणात एका नेतृत्वावर विश्वास ठेवून दिलीपराव कायम पवारांच्या सोबत राहिले आहेत. राजकारणात विचारभिन्नता मान्य आहे; पण विचारशून्यता उचित नाही, हे त्यांचे तत्त्व आदर्शवत असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

सत्कार सोहळ्याला उत्तर देताना वळसे पाटील यांनी, "शरद पवार यांच्या आशीर्वादामुळेच मी आज जो आहे तो आहे,' अशी कृतज्ञता व्यक्‍त केली. विधानसभा अध्यक्ष म्हणून सत्ताधारी पक्षापेक्षा सामान्य जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळावा, ही भूमिका होती. नाराजी असली तरी संसदीय पद्धती व परंपरा यापलीकडे जाण्याची शिस्त लावून घेतली, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाच्या निमंत्रक खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रास्ताविक केले, तर वळसे पाटील यांच्या कन्या पूर्वा वळसे पाटील यांनी आभार व्यक्‍त केले.

वळसेंच्या हाती महाराष्ट्र...
या सत्कार सोहळ्यात मुख्यमंत्र्यांनी दिलीप वळसे पाटील यांच्या खांद्यावर शाल घातली तर नितीन गडकरी यांनी त्यांना पुष्पगुच्छ दिला. शरद पवार यांनी महाराष्ट्राची प्रतिकृती असलेले स्मृतिचिन्ह दिले. याचा उल्लेख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणात केला. ते म्हणाले की, आम्ही शाल व पुष्पगुच्छ दिला; पण पवार यांनी महाराष्ट्र दिलीप वळसे पाटील यांच्या हाती सोपवला आहे. त्यामुळे, त्यांचे भविष्य उज्ज्वल दिसते. साठ वर्षांच्यानंतरच राजकारणात मोठ्या संधी मिळतात, असे मुख्यमंत्र्यांनी सांगताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले.

Web Title: mumbai maharashtra news devendra fadnavis talking