'डिजिटल सरकार'चा बोगस कारभार

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

मुंबई - कर्जमाफी ही सरकारप्रमाणेच किती बोगस आहे, हे सिद्ध झाले आहे. सरकारच्या ऑनलाइन कारभाराचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे "डिजिटल सरकार'चा हा बोगस कारभार असल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली.

मुंबई - कर्जमाफी ही सरकारप्रमाणेच किती बोगस आहे, हे सिद्ध झाले आहे. सरकारच्या ऑनलाइन कारभाराचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे "डिजिटल सरकार'चा हा बोगस कारभार असल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली.

कृषिमंत्री कुठे आहेत? असा प्रश्न उपस्थित करत मुख्यमंत्री हे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्यावर अविश्वास का दाखवत आहेत, याची विचारणा मलिक यांनी केली. फुंडकर यांच्याऐवजी सहकारमंत्री सुभाष देशमुख हेच पुढे पुढे करताना दिसत आहेत. ज्या मंत्र्यांनी नोटाबंदीच्या काळात कोट्यवधींची हेराफेरी केली, त्यांच्यावरच कर्जमाफीची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी का दिली? असा प्रश्नही मलिक यांनी विचारला. फुंडकर यांना कृषी किंवा सहकारमधील काही समजत नाही का? म्हणून मुख्यमंत्री देशमुखांना झुकते माप देत आहेत का? अशी विचारणाही त्यांनी केली. असे असेल तर सुभाष देशमुखांनाच कृषिमंत्री करा, असा सल्ला मलिक यांनी या वेळी दिला. सुभाष देशमुख यांच्या संस्था जशा बोगस आहेत, तसे ते मंत्री म्हणून बोगस असल्याची टीकाही केली.

शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरू
बोगस आधार कार्डवर कर्जमाफी कशी झाली? याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले पाहिजे. शिवाय ज्यांना कर्जमाफी झालेली नाही, अशा शेतकऱ्यांनाही कर्जमाफीची प्रमाणपत्रे कशी दिली गेली? असेही मलिक म्हणाले. शेतकऱ्यांची सरकारने ऐन दिवाळीत फसवणूक केली आहे. जर ही कर्जमाफीची प्रक्रिया 10 दिवसांत पूर्ण केली नाही, तर राष्ट्रवादी कॉंग्रेस रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांसाठी संघर्ष करेल, असा इशारा मलिक यांनी या वेळी दिला.

Web Title: mumbai maharashtra news digital government bogus work