नव्या पिढीला बरबाद करू नका - तटकरे

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

नववीच्या पुस्तकातील वादग्रस्त मजकूर काढण्याची मागणी

नववीच्या पुस्तकातील वादग्रस्त मजकूर काढण्याची मागणी
मुंबई - "इतिहासाचे विकृत लिखाण करून नव्या पिढीला बरबाद करू नका,' अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी विधान परिषदेत सरकारवर शरसंधान साधले. देश घडविण्यात इंदिरा आणि राजीव गांधी यांचे यांचे खूप मोठे योगदान असून ते मान्य करण्याचा मोठेपणा सरकारने दाखवावा, असे आवाहन करत त्यांनी संबंधित पुस्तकातील वादग्रस्त मजकूर काढून टाकण्याची मागणी केली.

राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता नववीच्या इतिहास आणि राज्यशास्र पुस्तकात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर छापल्याचे तीव्र पडसाद आज उमटले. याबाबत कॉंग्रेसचे संजय दत्त यांनी स्थगन प्रस्ताव मांडत या पुस्तकात इंदिरा गांधी यांच्यावर आणीबाणीबाबत, तर राजीव गांधी यांच्यावर बोफोर्स गैरव्यवहाराचा ठपका ठेवल्याचा उल्लेख पुस्तकात असून, सरकार चुकीची माहिती छापून इतिहास बदलत आहे, असा आरोप करत हा मजकूर तातडीने हटवण्याची मागणी केली. विरोधी पक्षातील सुनील तटकरे, शरद रणपिसे, भाई जगताप, कपिल पाटील यांच्यासह अनेक सदस्यांनी या संदर्भात निषेध व्यक्त करत कॉंग्रेसचे योगदान नाकारून नव्या पिढीचे मन कलुषित केले जात असल्याची टीका केली.

शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावत, अभ्यास मंडळाच्या कामात राजकीय हस्तक्षेप करणार नसल्याचे स्पष्ट केले. मात्र सभागृहाच्या आणि माझ्या भावना अभ्यास मंडळाला कळवेन असे आश्‍वासन त्यांनी दिले.

तटकरे यांनी, नववीच्या पुस्तकात इंदिरा आणि राजीव गांधी यांच्याबाबत पूर्वग्रहदूषित विकृत मनोवृत्तीने इतिहास बदलल्याचा आरोप केला. देश एकसंध घडविण्यात नेहरू आणि गांधी कुटुंबीयांचे योगदान मोठे असल्याचे सांगत बांगलादेशच्या निर्मितीत इंदिरा गांधी घेतलेल्या कणखर भूमिकेची आठवण त्यांनी दिली. कॉंग्रेसचे शरद रणपिसे यांनी इंदिरा गांधींनी राजकीय वैमनस्यातून इतिहास कधी बदलला नाही, हे सांगत त्यांनी लाल किल्ल्यातील कालकुपीची आठवण सांगितली.

तावडे यांनी यावर उत्तर देताना इंदिरा आणि राजीव गांधी यांना पुरेसा न्याय देण्यात आल्याचे सांगत नववीच्या पुस्तकातील दाखले देत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. यावर संतप्त झालेल्या तटकरे यांनी शिक्षणमंत्री विरोधकांच्या मताशी सहमत आहात का, असा प्रश्‍न करत तावडेंची कोंडी केली.

शाब्दिक खडाजंगी
पुस्तकातील वादग्रस्त भाग वगळण्याची मागणी लावून धरत विरोधकांनी गदारोळ केला त्यामुळे सभागृहाचे कामकाज पहिल्यांदा दहा मिनिटे नंतर 15 मिनिटांसाठी दोनदा स्थगित करण्यात आले. या वेळी विरोधक आणि सत्ताधारी सदस्यांमध्ये शाब्दिक खडाजंगी झाली.

Web Title: mumbai maharashtra news Do not waste the new generation