पॅकबंद वस्तूंवर दुहेरी किंमत छापता येणार नाही

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 7 जुलै 2017

मुंबई - एकाच प्रकारच्या पॅकबंद वस्तूंवर दोन (दुहेरी) कमाल किरकोळ किंमत (एमआरपी) छापण्यास आळा घालण्यात यावा, या राज्य शासनाने केलेल्या मागणीचा विचार करून केंद्र शासनाच्या ग्राहक उपभोक्ता मंत्रालयाने वैधमापनशास्त्र (आवेष्टित वस्तू) नियमामध्ये बदल केले आहेत.

मुंबई - एकाच प्रकारच्या पॅकबंद वस्तूंवर दोन (दुहेरी) कमाल किरकोळ किंमत (एमआरपी) छापण्यास आळा घालण्यात यावा, या राज्य शासनाने केलेल्या मागणीचा विचार करून केंद्र शासनाच्या ग्राहक उपभोक्ता मंत्रालयाने वैधमापनशास्त्र (आवेष्टित वस्तू) नियमामध्ये बदल केले आहेत.

एकाच प्रकारच्या पॅकबंद (आवेष्टित) वस्तूवर दोन (दुहेरी) एमआरपी छापण्याच्या प्रथेविरुद्ध राज्य शासनाच्या वैधमापनशास्त्र यंत्रणेने मागील वर्षी राज्यभरात विशेष मोहीम उघडली होती. त्यामध्ये दोन एमआरपी छापणाऱ्या मोठमोठ्या कंपन्यांविरुद्ध खटले नोंदविण्यात आले होते. या यंत्रणेच्या कारवाईस संबंधित कंपन्यांनी वेगवेगळ्या स्तरांवर तसेच न्यायालयात आव्हान दिले होते. ही प्रथा बंद व्हावी, यासाठी राज्य शासनाच्या वैधमापनशास्त्र यंत्रणेमार्फत मंत्री बापट व नियंत्रक गुप्ता यांनी केंद्राच्या ग्राहक उपभोक्ता मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. राज्याची मागणी लक्षात घेऊन ग्राहक उपभोक्ता मंत्रालयाने वैधमापनशास्त्र (आवेष्टित वस्तू) नियमामध्ये दि. 23 जून 2017 रोजीच्या राजपत्राद्वारे आवश्‍यक ते बदल केले आहे. यानुसार आता एकाच प्रकारच्या पॅकबंद वस्तूवर दोन एमआरपी छापण्यास बंदी घालण्यात आली आहे. या नियमातील बदल हे 1 जानेवारी 2018 पासून अमलात येणार आहे.

नियमात बदल होण्यासाठी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री गिरीश बापट व अपर पोलिस महानिरीक्षक तथा वैधमापनशास्त्र यंत्रणेचे नियंत्रक अमिताभ गुप्ता यांनी विशेष पाठपुरावा केला होता. राज्याच्या वैधमापन यंत्रणेने एकाच प्रकारच्या पॅकबंद वस्तूवर दुहेरी एमआरपी छापण्याच्या प्रथेमध्ये सामील असलेल्या मोठमोठ्या कंपन्यांना वरील राजपत्राच्या अनुषंगाने सुधारित नियमांची अंमलबजावणी करण्याबाबत नोटीस पाठविली आहे. त्याचप्रमाणे कायदा न जुमानता व ग्राहकांचे हित न जोपासता पॅकबंद वस्तूंची ऑनलाइन विक्री करणाऱ्या प्रमुख ऑनलाइन विक्रेत्यांविरुद्ध विशेष मोहिमेअंतर्गत कारवाई करण्यात आली होती. वैधमापनशास्त्र यंत्रणेच्या अहवालावरून नियमामध्ये आवश्‍यक ते बदल करून ऑनलाइन विक्रेत्यांनाही वैधमापनशास्त्र अधिनियम व त्याअंतर्गत नियमांच्या कार्यकक्षेत आणले आहे.

दुहेरी "एमआरपी' तक्रारींसाठी संपर्क
क्षेत्रीय वैधमापनशास्त्र कार्यालय
वैधमापनशास्त्र नियंत्रण कक्ष
dclmms_complaints@yahoo.com
पातळीवर कोकण विभाग - ई-मेल- -dyclmkokan@yahoo.in,
पुणे विभाग - dyclmpune@yahoo.in
नाशिक विभाग - dyclmnashik@yahoo.in
औरंगाबाद विभाग - dyclmaurangabad@yahoo.in
अमरावती विभाग - dyclmamravati@yahoo.in,
नागपूर विभाग - dyclmnagpur@yahoo.in
व्हॉट्‌सऍप क्रमांक - 9404951828.

Web Title: mumbai maharashtra news Double packed items can not be printed on packaged items