मुदतपूर्व निवडणुकांच्या चाचपणीला जोर

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 8 जुलै 2017

शिवसेना गंभीर, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसची तयारी सुरू

शिवसेना गंभीर, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसची तयारी सुरू
मुंबई - राज्यातील भाजप सरकारला तीन वर्षे पूर्ण होण्याच्या मुहूर्तावरच विधानसभेच्या मुदतपूर्व निवडणुकांचे वेध लागल्याचे संकेत असून, याबाबतच्या चाचपणीने जोर धरला आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेससह शिवसेनेतल्या काही आमदारांशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संपर्क साधत भाजप प्रवेशाची "अर्थपूर्ण' बोलणी सुरू झाली आहे; तर शिवसेनेनेदेखील पहिल्यांदाच मुदतपूर्व निवडणुकांची पूर्वतयारी म्हणून चाचपणी केली आहे.

ठाकरेंची संपर्क मोहीम
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या काही मोजक्‍या नेत्यांच्या सोबत याबाबत सविस्तर चर्चा केली असून, भाजपने मुदतपूर्व निवडणुकीचा निर्णय घेतल्यास पक्षाची रणनिती व तयारीचा आराखडा करण्याची सूचना त्यांनी नेत्यांना केली आहे. शिवसेनेतील अनेक आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा भाजप नेते करत आहेत. त्यामुळे प्रत्येक आमदारासोबत उद्धव ठाकरे यांनी संपर्क वाढवला असून, मतदारसंघातील परिस्थितीची विचारपूस सुरू केली आहे.

"राष्ट्रवादी'ची तयारी
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनाही भाजप मुदतपूर्व निवडणुका लादेल, अशी खात्री वाटत आहे. त्यामुळे प्रत्येक तालुक्‍यातील पक्षाच्या प्रमुख नेत्यांशी "राष्ट्रवादी'च्या वरिष्ठ नेत्यांनी वैयक्तिक चर्चा सुरू केल्या आहेत. कॉंग्रेसच्या पातळीवर मात्र शांतता असून, अद्याप पक्षाच्या तयारीबाबतची कोणतीही हालचाल दिसत नाही.

राज्यात अडीच वर्षांच्या कारभारानंतर सरकारमधील सहकारी पक्ष असलेल्या भाजप व शिवसेनेमध्ये वितुष्ट वाढत आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी गेल्या महिन्यात "मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केलेली असली तरी केवळ राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीचा संदर्भ त्यामागे होता, असे सांगितले जात आहे. मुंबई महापापालिकेत उद्धव ठाकरे बोलताना भाजपचे नगरसेवक निघून गेले. कर्जमाफीच्या संभ्रमानंतर सरकारने 2009 पासून कर्जमाफी लागू करण्याची अकस्मात घोषणा केली. यामुळे मुख्यमंत्री व भाजप नेते सध्या मुदतपूर्व निवडणुकीवर लक्ष ठेवून निर्णय घेत असल्याची चर्चा राजकीय व प्रशासकीय वर्तुळात आहे.

पक्ष पातळीवर...
"मुदतपूर्व'ला भाजप नेते आग्रही
कॉंग्रेसमध्ये मात्र शांतता
"राष्ट्रवादी'ची मतदारसंघनिहाय चाचपणी
शिवसेनाही तयारीला लागल्याचे सूचित

Web Title: mumbai maharashtra news Emphasis on the conduct of premier elections