तंत्रज्ञानाची पालखी अभियंत्यांनी उचलावी - राष्ट्रपती

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 18 जून 2017

पुणे - ‘‘नवं तंत्रज्ञान अधिकाधिक समृद्ध करत नेणं हे अभियांत्रिकीसारख्या उच्चशिक्षणातून शक्‍य आहे. तंत्रज्ञानातील प्रगतीची पालखी अभियंत्यांनी आपल्या खांद्यावर पेलायला हवी. यातूनच आपलं लष्करी सामर्थ्य अधिकाधिक सक्षम होईल. ‘तंत्रज्ञान सामर्थ्य-सुरक्षा-स्थैर्य’ अशी ही त्रिसूत्री आपण येत्या काळात अवलंबायला हवी,’’ अशा शब्दांत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी अभियंत्यांना आवाहन केले.

लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीएमई) पदवीप्रदान सोहळ्यात शनिवारी राष्ट्रपती बोलत होते. या वेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव, आर्मी ट्रेनिंग कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल डी. आर. सोनी, महाविद्यालयाचे कमांडन्ट लेफ्टनंट जनरल मायकल मॅथ्यूज, मेजर जनरल एच. के. अरोरा, जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. एम. जगदेश कुमार, डॉ. अनिल सहस्रबुद्धे, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट आदी उपस्थित होते.

एकूण ६९ विद्यार्थ्यांना सोहळ्यात राष्ट्रपतींच्या हस्ते पदव्या प्रदान करण्यात आल्या; तसेच १२ जणांना विशेष पारितोषिके देऊन गौरवण्यात आले. अभियांत्रिकी शाखेत पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातर्फे (जेएनयू) या पदव्या देण्यात येतात.

मुखर्जी म्हणाले, ‘‘उच्चशिक्षणाची जी तहान तुमच्यात जागृत झाली आहे, ती आता शमू देऊ नका. ती जागृत ठेवा. येणारा काळ अनेक आव्हानांचा आहे, त्यांच्याशी दोन हात करताना ही तहानच तुमच्या मदतीला येणार आहे. तंत्रज्ञानाचा चेहरा कधी नव्हे तेवढ्या वेगाने बदलत चालला आहे. अशा या काळात तुमची बुद्धिमत्ता, कौशल्य आणि संशोधनाची आसच कामी येणार आहे.’’

राष्ट्रपती म्हणाले 
देशातील दुर्गम भागांत पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे आव्हान अभियंत्यांनी पेलावे
अत्याधुनिक आणि जागतिक पातळीचे तंत्रज्ञान देशात विकसित करावे
देशांतर्गत सुरक्षा, सायबर क्राईम, आंतरराष्ट्रीय रणनीती यासाठी सज्ज राहावे

Web Title: mumbai maharashtra news The engineers of technology should be picked up