शहरांभोवती वेसणीला सुरवात 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 2 जून 2017

शेतकरी संप सुरू; मागण्या फेटाळल्या 
मुंबई - शेतात कष्टाने वाढवलेला भाजीपाला आणि घरच्या गाई-म्हशींच्या दुधाचा सडा पडल्याचे चित्र राज्याच्या अनेक भागांत आज दिसले. संपावर गेलेल्या बळिराजाने आजपासून शहरांची वेसण आवळायला सुरवात केल्याने शेतकऱ्यांच्या संपाची तीव्रता उद्यापासून (ता. 2) अधिक तीव्र होण्याची शक्‍यता आहे. संपाचा आज शहरांना मोठा फटका बसला नसला, तरी शेतकऱ्यांनी मात्र संपाला संमिश्र प्रतिसाद दिला आहे. संपकऱ्यांना सरकारने आज कोणताच प्रतिसाद न दिल्याने उद्याही तो सुरू राहणार आहे.

शेतकरी संप सुरू; मागण्या फेटाळल्या 
मुंबई - शेतात कष्टाने वाढवलेला भाजीपाला आणि घरच्या गाई-म्हशींच्या दुधाचा सडा पडल्याचे चित्र राज्याच्या अनेक भागांत आज दिसले. संपावर गेलेल्या बळिराजाने आजपासून शहरांची वेसण आवळायला सुरवात केल्याने शेतकऱ्यांच्या संपाची तीव्रता उद्यापासून (ता. 2) अधिक तीव्र होण्याची शक्‍यता आहे. संपाचा आज शहरांना मोठा फटका बसला नसला, तरी शेतकऱ्यांनी मात्र संपाला संमिश्र प्रतिसाद दिला आहे. संपकऱ्यांना सरकारने आज कोणताच प्रतिसाद न दिल्याने उद्याही तो सुरू राहणार आहे.

दरम्यान, संपकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि उत्पादन खर्चाच्या दीडपट वाढ देण्याची मागणी थेट फेटाळून लावत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपकऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. या पार्श्‍वभूमीवर किसान क्रांती मोर्चाच्या कोअर कमिटीची बैठक औरंगाबाद येथे बोलाविण्यात आली आहे. 

संपाला राज्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. काही तुरळक हिंसेचे प्रकार वगळता संप शांततेत सुरू असल्याचा दावा किसान क्रांती मोर्चाचे समन्वयक धनंजय दोर्डे यांनी केला. तसेच संपकऱ्यांबरोबर सरकारकडून कोणीही चर्चा केली नसल्याने आजही कोंडी फुटली नाही. उद्यापासून या संपाची व्याप्ती आणि तीव्रता वाढणार असल्याचे संपकऱ्यांच्या प्रतिनिधींनी सांगितले.

राज्यात संपाला काही ठिकाणी हिंसेचे गालबोट लागल्याचे त्यांनी मान्य केले; मात्र यास व्यापारी जबाबदार असून, शेतकऱ्यांच्या जिवावर मोठ्या झालेल्या व्यापाऱ्यांनीही संपाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन मोर्चाने केले आणि ही अराजकीय चळवळ असल्याचा दावा त्यांनी केला. 

पश्‍चिम महाराष्ट्र 
- नगर जिल्ह्यातील कोपरगावजवळ येवला रस्त्यावर 150 ते 200 ट्रक जमावाने फोडले. त्यातील कोट्यवधी रुपयांचा माल जमावाने लुटला. या जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. 
- तालुक्‍यात नगर-मनमाड रस्त्यावरील टाकळी फाटा, येसगाव, खिर्डी गणेश, धामोरी फाटा, येवले रस्त्यावरील टोल नाका, नागपूर-मुंबई महामार्गावर दहेगाव बोलका, संवत्सर येथे शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध, कांदे, बटाटे, डाळिंब, लिंबू, कैऱ्या फेकून दिल्या. 
- खिर्डी गणेश शिवारात इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप पेटविण्याचा जमावाने प्रयत्न केला. तो कोपरगाव ग्रामीण पोलिसांनी हाणून पाडला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. जमावातील 15 ते 20 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

मराठवाडा 
- उस्मानाबाद जिल्ह्यात कर्जमाफी, योग्य भावाप्रश्‍नी सरकारला सुबुद्धी द्यावी म्हणून तुळजाभवानी मंदिरात शेतकऱ्यांकडून महाआरती. 
- तुळजापूर भाजी मंडईत शुकशुकाट 
- भाजीपाला, धान्य न आल्याने भूम आठवडे बाजार सुनासुना 
- इनगोंदा (ता. परंडा), विलासपूर (पांढरी, ता. लोहारा), कसबेतडवळे (ता. उस्मानाबाद) येथे रस्त्यावर दूध ओतून निषेध. 
- ईट (ता. भूम) येथील शेतकऱ्यांनी दूध डेअरीला देण्याऐवजी खवा भट्टीसाठी दिले. यापुढे डेअरीला दूध न देण्याचा संकल्प. 
- जालना जिल्ह्यात औरंगाबाद-सोलापूर मार्गावर वडीगोद्री येथे "रास्ता रोको' 
- बदनापूर ः रस्त्यावर टाकले दूध. 
- नांदेड जिल्ह्यात शहरात येणारा भाजीपाला, फुले, फळे, दूध, अंडी रस्त्यावर फेकली, शेतीमालाची वाहने अडवली 
- संभाजी बिग्रेड, शेतकरी संघटना, आप आदींतर्फे आंदोलन, टरबुजाला दुग्धाभिषेक. 
- उमरी, अर्धापूर आदी तालुक्‍यांत आंदोलन, प्रशासनाला निवेदन 
- परभणी जिल्ह्यात गंगाखेड येथे शेतकरी संघटनेने भाजीपाला विकत घेऊन जनावरांना खाऊ घातला 
- रुमणापाटी (गंगाखेड) येथे दूध रस्त्यावर फेकले 
- मानवत ः मुंबईकडे जाणारा ट्रक अडवला, भाजीपाला रस्त्यावर फेकला 
- परभणी, पूर्णा येथे आवक घटली, व्यवहार सुरळीत 
- हिंगोली जिल्ह्यात बासंबा (ता. हिंगोली) येथे उपोषण, चिंचोर्डी (ता. कळमनुरी) येथे धरणे.

दोन ठिकाणी गोळीबार 

येवला टोल नाक्‍यावर वाहनांतील भाजीपाला रस्त्यावर ओतला, मांस वाहतूक करणारा टेंपो पेटवण्यात आला. कोपरगाव-येवला रस्त्यावर शेतकऱ्यांच्या आडून तरुणांनी शेतमाल लुटला. पिंपळगाव जलाल टोक नाक्‍यावर तणाव निर्माण झाल्यामुळे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक जण गंभीर जखमी झाला. नैताळे (ता. निफाड) येथे नाशिक-औरंगाबाद महामार्गावर ट्रक-टेंपो अडवून कांदा, डाळिंब, आंबे रस्त्यावर ओतले गेले. जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला, तसेच अश्रुधुराची नळकांडी फोडली. प्लॅस्टिक गोळ्यांचा माराही केला. त्यात एक शेतकरी जखमी झाला.

ज्यांच्या हातात दिल्लीची सत्ता आहे, त्यांनी एका राज्यात कर्जमाफी दिली. त्यामुळे अन्य राज्यांतील लोकांची कर्जमाफीची मागणी होणे, हे काही चुकीचे नाही. अस्वस्थ झालेले शेतकरी लोकशाहीच्या मार्गाने आपल्या तीव्र भावना व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. 
- शरद पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष 
 

केंद्र आणि राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे आणि शेतकरीविरोधी धोरणांमुळे राज्यातील शेतकरी देशोधडीला लागला आहे. सत्तेत बसलेल्या लोकांना शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत काहीच कळत नसल्याने शेतकऱ्यांवर संप करण्याची वेळ आली आहे. 
- अशोक चव्हाण, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष 

शेतकऱ्यांनी संपावर जाणे ही राज्यकर्त्यांसाठी शरमेची बाब आहे. सरकारने अंतर्मुख होऊन विचार करण्याची वेळ आली आहे. शेतकरी आता चिडलेला असून, त्यांच्या मागण्यांकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. हा संप म्हणजे अराजकतेची सुरुवात आहे. 
- राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते

शेतकरी संपाचा परिणाम 

पुण्यात भाज्यांचे भाव 30 टक्‍क्‍यांनी वाढले 

- शेतीमालाची आवक निम्म्याने घटली. 
- फळभाज्या, पालेभाज्यांचा पुरवठा विस्कळित 
- घाऊक बाजारातील फळभाज्या, पालेभाज्यांचे भाव तीस टक्‍क्‍यांनी वधारले 
- नाशवंत माल फेकून देण्याच्या स्थितीत 
- शीतगृहात संकलन केलेल्या दुधाची आवक घटली 
- दोन दिवस पुरेल एवढाच डेअरीवाल्यांकडे दुधाचा साठा 
- संतप्त शेतकऱ्यांकडून टोलनाक्‍यांवर माल वाहतूक ट्रकची अडवणूक 
- शेतकरी विरोधी धोरणाबद्दल केंद्र व राज्य सरकारचा निषेध

पिंपरीत 10 टक्के भाववाढ 

- मोशी उपबाजारातील आवक आणि भावही वाढले 
- पिंपरी मंडईतील अनेक गाळे बंद 
- मावळ तालुक्‍यात संपाचा परिणाम नाही 
- छावा संघटनेचा वाकडमध्ये रास्ता रोको 
- आंदर मावळात संपाला प्रतिसाद

नाशिक जिल्ह्यात हिंसक वळण 
नाशिक जिल्ह्यात येवला-कोपरगाव महामार्गावरील पिंपळगाव जलाल येथील टोल नाक्‍यावर संपाला हिंसक वळण मिळाले. शेतकऱ्यांकडून महामार्गावरील गाड्या अडवून शेतमाल रस्त्यावर फेकण्यात आला. संपाचा फायदा घेऊन गाड्यांतील साहित्यांची लूटमार सुरू केल्याने पोलिसांनी लाठीमार केला. मात्र यामुळे चिडलेल्या शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केली, तर उत्तरादाखल पोलिसांनी अश्रुधुराचे नळकांडे फोडत प्लॅस्टिक गोळ्यांचा वापर केला. यात एक शेतकरी जखमी झाला. निफाड तालुक्‍यातील देवगाव, भरवस फाटा, नैताळे येथे पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला, तर काही शेतकऱ्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, लासलगाव बाजार समितीला आंदोलकांनी टाळे ठोकले. लासलगाव पोलिस ठाण्यात 24 शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करून आठ शेतकऱ्यांना अटक करण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai maharashtra news farmer strike