महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करा - मलिक

महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करा - मलिक

मुंबई - स्वसंरक्षणासाठी दिलेल्या बंदुकीचा गैरवापर करून वन्यजीव कायद्याचा भंग करणारे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्‍यातील वरखेडेमध्ये नरभक्षक बिबट्याला मारण्याचा आदेश सरकारने दिला आहे. त्याचवेळी सरकारमधील मंत्री गिरीश महाजन स्वत:च्या संरक्षणाला दिलेली बंदूक घेऊन बिबट्याला मारायला बाहेर पडल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने जोरदार आक्षेप घेतला. 'महाजन यांचा हा पहिलाच प्रताप नसून, याअगोदर त्यांनी विधानसभेत बंदूक आणली होती. तसेच लहान मुलांच्या एका कार्यक्रमात त्यांनी बंदूक दाखवली होती आणि दुसरीकडे दारूच्या दुकानाला महिलांचे नाव देण्याचे वादग्रस्त विधानही त्यांनी केले होते. आत्ता तर चक्क बिबट्याला मारण्यासाठी खुलेआम बंदूक घेऊन फिरताना दिसत आहेत. त्यांनी स्वसंरक्षणासाठी दिलेल्या बंदुकीचा गैरवापर केला असून, त्यांनी वन्यजीव कायद्याचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करून लगेचच खटला चालवावा, अशी मागणी मलिक यांनी केली. महाजनांवर सरकार कारवाई करणार नसेल तर आम्ही दिल्लीतील संबंधित नियुक्त अधिकाऱ्याकडे तक्रार करणार असल्याचेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे.

चिमणीसुद्धा मारली नाही - महाजन
"मी स्वतः शाकाहारी असून, आजपर्यंत एक चिमणीसुद्धा मारली नाही,' असे स्पष्टीकरण जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना दिले. 'बिबट्याच्या हल्ल्यात मृत पावलेल्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी जात असताना रस्त्यात अचानक बिबट्या दिसल्याचा आरडाओरडा सुरू झाला असता लोकांची आणि प्राण्यांची धावपळ सुरू झाली. त्यामुळे मी इतर अधिकाऱ्यांसह गाडीतून उतरलो. लोकांची सुरक्षा हा माझा उद्देश होता. त्यामागे बिबट्याची शिकार करणे हा हेतू नव्हता. कुठलीही स्टंटबाजी मी केली नाही,'' असे महाजन म्हणाले. "गाडीत बसून राहिलो असतो तर मंत्री गाडीतून उतरलेही नाहीत, अशी टीका झाली असती, लपून राहणे हा माझा स्वभाव नाहीच, म्हणून मी गाडीतून उतरून परिस्थितीला सामोरे गेलो', असेही महाजन यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com