मुंबई - "जेंडर बजेट'च्या अंमलबजावणीसाठी राज्यात अर्थ विभागाच्या अंतर्गत "जेंडर बजेट सेल'ची स्थापना करण्यात येणार आहे. महिला व बालविकाससंबंधीच्या योजना आणि कार्यक्रमाचा निधी योग्य पद्धतीने राखून ठेवणे आणि त्याचा प्रभावी विनियोग करून महिला व बालकांच्या जीवनमानात प्रत्यक्षात बदल घडवून आणणे, यासाठी आंतरविभागीय समितीची स्थापना करण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आल्याची माहिती, अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
सह्याद्री अतिथिगृहात यासंबंधी आज आयोजित केलेल्या विशेष बैठकीत ते बोलत होते. प्रत्येक शासकीय विभागात महिला व बालविकास योजनांच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने एका नोडल अधिकाराची नियुक्ती करावी, अशी सूचना त्यांनी दिली. तसेच महिला व बालकांच्या विकासाच्या योजनांची विविध विभागांकडून अंमलबजावणी केली जाते. त्याची सांगड घालून त्याची अंमलबजावणी अधिक प्रभावी आणि गुणवत्तापूर्ण कशी होईल, याकडे हा सेल लक्ष देईल, असेही मुनगंटीवर म्हणाले.
|