मंत्री गिरीश महाजन यांची चौकशी व्हावी ! - सचिन सावंत

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 26 मे 2017

मुंबई - दहशतवादी दाऊद इब्राहिमच्या जवळच्या नातेवाइकाच्या लग्न समारंभाला जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि भाजपचे तीन आमदार उपस्थित राहणे हे अतिशय धक्कादायक असून, या सर्वांची उच्चस्तरीय चौकशी व्हावी. दाऊदप्रकरणी एकनाथ खडसेंना एक न्याय असेल तर गिरीश महाजन यांना वेगळा न्याय कशासाठी? अशी टीका कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. आज आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ज्या लग्नसमारंभाला भाजपचे नेते उपस्थित राहिले ते दाऊद इब्राहिमच्या जवळच्या नात्यातील आहेत. या लग्न समारंभाला भाजप नेत्यांबरोबरच अनेक पोलिस अधिकारीही उपस्थित असणे हे धक्कादायक होते. यातून दाऊदचे हितसंबंध किती खोलवर रुजलेले आहेत, हे दिसून येते. या लग्नसमारंभाला उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांची नाशिकच्या पोलिस आयुक्तांनी चौकशी सुरू केली असून, याचबरोबर आयबीचीही चौकशी सुरू असल्याचे समजते. यातूनच या विषयाचे गांभीर्य लक्षात येते. आयबीची चौकशी सुरू होणे याचा अर्थ सदर दाऊदचे नातेवाईक हे आयबीच्या रडारवर आहेत, हे स्पष्ट आहे. त्याच्या पुढे जाऊन सदर नातेवाईक हा बेटिंगच्या व्यवसायात अग्रगण्य असून, या समारंभाला अंडरवर्ल्डमधले अनेक गुंड, बुकी उपस्थित होते, असा संशय असल्याचा दावा सावंत यांनी केला.

Web Title: mumbai maharashtra news girish mahajan inquiry