मुली का टाळतात छेडछाडीच्या तक्रारी?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 मार्च 2018

मुंबई - रेल्वे प्रवासात होणाऱ्या छेडछाडीची महिला आणि मुली तक्रार न करता त्याकडे दुर्लक्ष करतात. गर्दीच्या कारणासह घरी वा इच्छित स्थळी होणारा विलंब या कारणांमुळे मुली अशा "रोमिओ', तसेच महिलांच्या डब्यात आढळणाऱ्या वात्रट महिला यांच्याविरोधात तक्रार करण्यास पुढे येत नाहीत. गुरू नानक खालसा महाविद्यालयाच्या 10 विद्यार्थ्यांनी "पुकार' या संस्थेमार्फत केलेल्या सर्वेक्षणामध्ये ही बाब समोर आणली आहे.

"पुकार'च्या या 10 जणांच्या सर्वेक्षण टीममध्ये आठ मुलींचा समावेश होता. त्यातील सहा मुलींना ट्रेनमधील प्रवासादरम्यान छेडछाडीचा सामना करावा लागल्याने त्यांनी हा विषय संशोधनासाठी निवडल्याचे त्यांनी म्हटले आहे. मुंबईतील दादर, माटुंगा (मध्य व पश्‍चिम या दोन्ही ठिकाणी), कुर्ला, किंग्ज सर्कल, वडाळा रोड यादरम्यान प्रवासी विद्यार्थिनींच्या माध्यमातून त्यांनी हे सर्वेक्षण केले.

अनेकदा बायकांकडूनही छेडछाड होते. सर्वेक्षणादरम्यान एका मुलीने सांगितले की, रिकाम्या ट्रेनमध्ये एका बाईने तिच्या शरीराला विचित्र ठिकाणी हात लावला होता. अनेकदा ट्रेनमध्ये महिला मुलींबाबत कपडे, मेकअप यावरून खूपच अश्‍लील, वाईट शब्दांत टिप्पणी करतात.
- स्टेला फर्नांडिस

माझ्याबाबतीत दोन ते तीन वेळा अशी घटना घडली. एक मुलगा माझा व माझ्या मैत्रिणीचा पाठलाग करायचा; परंतु मैत्रिणीचे वडील आम्हाला सोडायला यायला लागल्यावर त्याने आमचा पाठलाग थांबवला; पण पुन्हा त्याने ते सुरू केले. मग आम्ही ट्रेनची वेळच बदलली. या अनुभवातून मी बरेच शिकले. आता रस्त्यात उभे राहून प्रतिकार करते.
- शिवानी पिंपळकर, सर्वेक्षण पथकातील विद्यार्थिनी

पोलिस ठाणे, न्यायालयात जाणे, पुढील अनेक बाबींसाठी आणि एकंदरीतच मुली व महिलांना स्वतःसाठी हा वेळ असायलाच हवा. तुमच्यासाठी कोणी दुसरा येऊन लढणार नाही. वैयक्तिक तक्रारी घेऊन एक एक मुलगी जेव्हा पुढे येईल, तेव्हा ही एक मोठी चळवळ होईल. मग इतर महिला व मुलींना भविष्यात हा त्रास होणार नाही.
- दीपेश टॅंक, वॉर अगेन्स्ट रेल्वे रावडीज कॅम्पेन

मुली तक्रार का टाळतात?
- वेळ नाही म्हणून
- घरात किंवा शेजाऱ्यांना समजले तर?
- तक्रार कशी व कुठे करायची ते माहीत नाही
- हेल्पलाइन क्रमांकावर पटकन प्रतिसाद मिळत नाही
- पुढे त्रास होईल म्हणून
- भीती व असुरक्षित वाटत असल्यामुळे

Web Title: mumbai maharashtra news girl tampering complaint