एड्‌स नियंत्रणात केंद्राचा आखडता हात

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

राज्य सरकारकडून निधीसाठी सातत्याने पाठपुरावा

राज्य सरकारकडून निधीसाठी सातत्याने पाठपुरावा
मुंबई - एड्‌स आणि गुप्तरोग रुग्णांवर उपचार करण्याबरोबरच त्यांना अन्य सेवा पुरविण्याच्या कामासाठी आवश्‍यक असणाऱ्या निधीसाठी केंद्र सरकारने गेल्या तीन वर्षांत हात आखडता घेतल्याने राज्य सरकारला कसरत करावी लागत आहे. राज्यात बाधित रुग्णांची संख्या 90 हजारांच्या आसपास असून, त्यांच्यावरील उपचारांसाठी सरकार केंद्राकडे निधीचा पाठपुरावा करत असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

केंद्र सरकारच्या अखत्यारीतील राष्ट्रीय एड्‌स नियंत्रण संघटनेच्या निदर्शनाखाली राज्य एड्‌स नियंत्रण ही अशासकीय संस्था कार्यरत आहे. या संस्थेमार्फत देहविक्री करणाऱ्या महिला, समलिंगी पुरुष, शिरेद्वारे मादक पदार्थ सेवन करणारे, ट्रकचालक, स्थलांतरित कामगार आणि तृतीयपंथीयांच्या आरोग्य चाचण्या करून त्यांच्यावर योग्य उपचार केले जातात. यासाठी केंद्र सरकारकडून अर्थपुरवठा करण्यात येतो. डिसेंबर 2016 ते मार्च 2017 पर्यंत राज्याच्या संस्थेला मिळणारे अनुदान थकले असल्याने रुग्णांवरील उपचार आणि कर्मचाऱ्यांचे वेतन रखडल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याचबरोबर गेल्या तीन वर्षांतील केंद्र सरकारकडून प्राप्त झालेल्या निधीवर लक्ष दिले असता हा निधी वाढवून मिळण्याऐवजी केंद्राकडून सातत्याने कपात करण्यात येत असल्याचे दिसून येते. त्यामुळे राज्यातील रुग्णांवरील उपाचारांत अनेक अडचणी येत असल्याचे सांगण्यात आले. महाराष्ट्र राज्य एड्‌स नियंत्रण संस्थेने राष्ट्रीय संघटनेकडे पुरेसे अनुदान देण्यासाठी सप्टेंबर आणि ऑक्‍टोबर 2016 मध्ये पत्रान्वये विनंती केली आहे. त्याचबरोबर यंदाच्या जानेवारी, मार्च आणि मेमध्ये राष्ट्रीय संघटनेच्या मुंबईत झालेल्या बैठकीतही अनुदानाबाबत पाठपुरावा करण्यात आला असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र केंद्राच्या संघटनेकडून अद्यापपर्यंत प्रलंबित अनुदान मिळाले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

आरोग्य विभागाकडील नोंदणीकृत रुग्णांचा तपशील असा -
- देहविक्री करणाऱ्या महिला - 56 हजार 884 पैकी एड्‌सची लागण झालेल्या 174
- समलिंगी पुरुष - 19 हजार 974 पैकी एड्‌सची लागण झालेले 61
- तृतीयपंथी - 3196 पैकी एड्‌सची लागण झालेले 26
- शिरेद्वारे मादक पदार्थ सेवन करणारे ः 352 पैकी एड्‌सची लागण झालेले 1
- स्थलांतरित कामगार - 6 लाख 11 हजार 412 पैकी एड्‌सची लागण झालेले 395
- ट्रकचालक - 7 लाख 30 हजार 279 पैकी एड्‌सची लागण झालेले 67

राज्याकडील रुग्णांची नोंद
- देहविक्रय करणाऱ्या महिला - 56 हजार 884
- देहविक्रय करणाऱ्या एचआयव्हीग्रस्त महिला - 174
- समलिंगी पुरुष - 19 हजार 974
- एचआयव्हीबाधित समलिंगी - 61
- तृतीयपंथी - 3196
- एचआयव्हीबाधित - 26
- शिरेतून अमली पदार्थ घेणारे - 352
- एचआयव्ही संसर्ग - 1
- स्थलांतरित कामगार - 6 लाख 11 हजार 412
- एचआयव्हीग्रस्त - 395
- ट्रकचालक - 7 लाख 30 हजार 279
- एचआयव्हीबाधित - 67
Web Title: mumbai maharashtra news hands on the center of AIDS control