शिवसेनेच्या कोंडीसाठी राणेंना गृहनिर्माण खाते?

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

मुंबई - सत्तेत सहभागी असूनही नेहमीच विरोधकांची भूमिका पार पाडणाऱ्या शिवसेनेची कोंडी करण्यासाठी मंत्रिमंडळ विस्तारात नारायण राणे यांच्याकडे गृहनिर्माण खाते सोपविण्यात येणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून सांगण्यात आले. नारायण राणे यांनी महसूलसह गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम खात्याची मागणी केल्याने विस्तारात त्यांना कोणती जबाबदारी देण्यात येईल याबाबत उत्सुकता आहे.

नारायण राणे यांचा योग्य सन्मान करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा स्पष्ट केले आहे. गृहनिर्माण खाते सध्या प्रकाश महेता यांच्याकडे आहे. महेता हे अमित शहा यांचे निकटवर्तीय असल्याचे बोलले जाते. पण, नियम धाब्यावर बसवून काम करण्याच्या त्यांच्या शैलीमुळे ते अडचणीत आले आहेत. त्यांना मंत्रिमंडळातून काढावे यासाठी विरोधी पक्षांनी गेल्या अधिवेशनात आक्रमक पवित्रा घेतला होता. मात्र राष्ट्रीय अध्यक्षांसोबत असलेले संबंध लक्षात घेता मंत्रिमंडळातून त्यांना वगळणे सोपे नाही. अशा स्थितीत महेता यांचे किमान खाते तरी बदलणे भाजपसाठी आवश्‍यक आहे. त्यामुळे गृहनिर्माण खाते राणेंच्या वाट्याला येऊ शकते. शिवसेना आणि मुंबईवर वर्चस्व राखण्यासाठी गृहनिर्माण खाते महत्त्वाचे आहे. शिवसेनेसाठी मुंबईतील इमारतींचा पुनर्विकास, झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन आदी बाबी महत्त्वाच्या आहेत. गृहनिर्माण राज्यमंत्रिपद रवींद्र वायकर यांच्याकडे आहे. हे खाते राणेंकडे आणल्यास ते शिवसेनेची अनेक ठिकाणी कोंडी करू शकतात.

राणेंनी मागणी केली असली तरी त्यांना महसूल खाते मिळणे अवघड आहे. चंद्रकांत पाटील हेही अमित शहा यांचे निकटवर्तीय आहेत. राज्य सरकारच्या सर्व महत्त्वाच्या निर्णयांत त्यांचा सक्रिय सहभाग असतो. शेतकरी संप असो की मराठा आंदोलन, चंद्रकांत पाटील यांची भूमिका "संकट मोचक' अशीच आहे. स्वतः चंद्रकांत पाटील यांनीच राणे यांच्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याचा विचार करू, अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे राणेंना बांधकाम खात्याची सूत्रे देण्याचा विचार होऊ शकतो.

सावधपणे निर्णय
नारायण राणे यांच्याविषयी सावधपणे आणि कोणतीही घाई न करता भाजप निर्णय घेत आहे. राणे हे बेधडक विधानांसाठी आणि आक्रमक कार्यशैलीसाठी प्रसिद्ध आहेत. मनाविरुद्ध गोष्टी घडू लागल्या, की राणे पक्षशिस्त बाजूला ठेवून थेट नेतृत्वावर हल्ला चढवतात, हे त्यांनी शिवसेना आणि कॉंग्रेसमध्ये असताना दाखवून दिले आहे. म्हणूनच राणेंना भाजपने स्वतंत्र पक्षाचा तंबू उभारायला लावला आणि मित्रपक्षाचे नेते असा दर्जा देऊन त्यांना मंत्री करण्याची तयारी चालवली आहे.

Web Title: mumbai maharashtra news home department for narayan rane