शेकडो बालमृत्यूनंतरच सरकारला जाग

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 27 डिसेंबर 2017

मुंबई - नाशिक आणि ठाणे रुग्णालयात शेकडोंच्या संख्येने बालकांचा बळी गेल्यावर राज्य सरकारला जाग आली आहे. या दोन्ही सरकारी रुग्णालयांतील रिक्‍त पदे भरण्याचे आश्‍वासन सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी विधिमंडळ अधिवेशनात दिल्यानंतर सरकारदरबारी ही पदे भरण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. यासाठी आरोग्य संचालनालयाकडून राज्यभरातील रुग्णालयांचा आढावा घेण्यास सुरवात झाल्याची माहिती मंत्रालयातून देण्यात आली.

नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात इन्क्‍युबेटर, व्हेंटिलेटर यांसह अनेक वैद्यकीय सुविधा व तज्ज्ञ डॉक्‍टर नसल्यामुळे एप्रिल ते ऑगस्ट 2017 या पाच महिन्यांत 227 नवजात बालकांचा मृत्यू झाला. ठाणे येथील सिव्हिल रुग्णालयात एप्रिल ते सप्टेंबर 2017 या काळात याच कारणांमुळे 47 बालकांचा मृत्यू झाला. मूलभूत सोयी-सुविधांचा अभाव, विशेषज्ञांच्या अभावासह रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या रिक्त पदांमुळेच या बालकांचे मृत्यू झाल्याचे सावंत यांनी मान्य केले होते.

नाशिक महापालिकेच्या तीन रुग्णालयांतील 17 इन्क्‍युबेटर बंद आहेत. नाशिक जिल्ह्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांची 68 पदे रिक्त असून पाच जिल्ह्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातील अनेक उपकरणे नादुरुस्त असल्याने खासगी रुग्णालयातून तपासणी करून घ्यावी लागत आहे. त्यामुळे रुग्ण व नातेवाइकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. बालकांच्या मृत्यूनंतर परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी नाशिकसह अमरावती व चंद्रपूर येथील जिल्हा रुग्णालयांत "लेव्हल थ्री'चे एनआयसीयू सुरू करण्याचा निर्णय सरकारने 11 सप्टेंबर रोजी घेऊनही ऑक्‍टोबरपर्यंत एनआयसीयू सुरू झालेले नाही.

या पार्श्‍वभूमीवर नाशिक जिल्हा रुग्णालय व ठाणे शासकीय रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांकरिता विशेष कक्ष उघडण्यात आले आहेत. त्यानुसार 14 विशेषज्ञांची सेवा दिली जात आहे. नाशिक जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी वर्ग-1 व 2 यांच्या 63 मंजूर पदांपैकी 53 पदे भरली आहेत. वर्ग-3 व 4 यांच्या 592 मंजूर पदांपैकी 491 पदे भरली आहेत. ठाणे सामान्य रुग्णालये वैद्यकीय अधिकारी वर्ग- 1 व 2 यांच्या 53 मंजूर पदांपैकी 40 पदे भरली आहेत. तसेच वर्ग- 3 व 4 यांच्या 466 मंजूर पदांपैकी 363 पदे भरली आहेत. दाखल होणाऱ्या बालकांची संख्या व खाटांची क्षमता लक्षात घेऊन अतिरिक्त 18 रेडियंट वॉर्मर, 2 फोटोथेरपी युनिट, 3 सिरीज पंप व 2 सी पॅप मशिन आदी सामग्री पुरवण्यात आली आहे. 18 अतिरिक्त परिचारिकांनाही मंजुरी देण्यात आली आहे. रुग्णालयांतील उर्वरित रिक्त पदे भरण्याची कार्यवाही आरोग्य विभागाने सुरू केल्याची माहिती मंत्रालयातून देण्यात आली.

Web Title: mumbai maharashtra news Hundreds of childhood survivors awake to the government