मुंबई - विरोधी पक्षाच्या दृष्टीने अत्यंत प्रतिष्ठेच्या बनलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत तुटलेली कॉंग्रेस - राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीत पुन्हा समझोता होण्याची चिन्हे असून, मंगळवारी "राष्ट्रवादी'च्या वतीने एकही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला नाही. "राष्ट्रवादी'चे अध्यक्ष शरद पवार व कॉंग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांच्यात आघाडीसाठी सकारात्मक चर्चा सुरू असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
गुजरातमधील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रभारी प्रफुल्ल पटेल व कॉंग्रेसचे अशोक गेहलोत आणि भरतसिंह सोळंकी यांनाही दिल्लीत तातडीने बोलावण्यात आले असून, आघाडी कायम राहील यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील 89 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज अखेरचा दिवस होता.
पाटीदारांचे वर्चस्व असलेल्या सौराष्ट्र व दक्षिण गुजरात मध्ये हा पहिला टप्पा पार पडत आहे. त्यासाठी 377 जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नसल्याची माहिती मिळाली आहे.
"राष्ट्रवादी'ला विश्वासात न घेता कॉंग्रेसने उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्यानंतर "राष्ट्रवादी'ने 188 पैकी 182 जागांवर स्वबळावर उमेदवार उभे करण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र, त्यानंतर झालेल्या राजकीय हालचालींमध्ये विरोधकांच्या मतांची विभागणी होऊ नये यासाठी "राष्ट्रवादी'ने सबुरीची भूमिका घेतली आहे. दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसला अपेक्षित मतदारसंघात कॉंग्रेस संधी देईल, असा विश्वास असून, कॉंग्रेसच्या विरोधात भूमिका न घेता समझोता करून निवडणुकीला सामोरे जाण्याची भूमिका "राष्ट्रवादी'ने घेतली आहे.
महाराष्ट्रातही "एकोपा'..
गुजरातमध्ये कॉंग्रेस - राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये तणावाची स्थिती असली तरी त्याचे पडसाद महाराष्ट्रात पडणार नाहीत याची तातडीने दखल आज दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी घेतली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सरकारी निवासस्थानी दोन्ही पक्षाच्या नेत्यांची बैठक आज झाली. यावेळी 12 डिसेंबर या शरद पवार यांच्या वाढदिवशीच नागपूरला विधानभवन वर संयुक्त मोर्चा काढण्यावर शिक्कामोर्तब झाले. या अगोदर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा 11 डिसेंबरला तर कॉंग्रेस मोर्चा 13 तारखेला ठरला होता. मात्र, सर्व विरोधी पक्षाचा एकत्रच मोर्चा व्हावा यासाठी आज दोन्ही पक्षांनी सहमती दर्शविली.
पवाराच्या सोबत कॉंग्रेस नेत्यांची बैठक
दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रवादीला संधीची शक्यता
|