कर्जमुक्ती, हमीभावासाठी संसदेत विधेयके मांडणार - राजू शेट्टी

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 18 जानेवारी 2018

मुंबई - देशातील शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमुक्ती मिळावी आणि उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळावा, यासाठी दोन स्वतंत्र खासगी विधेयके आगामी अर्थसंकल्पी अधिवेशनात संसदेत मांडणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी सांगितले. ते मंत्रालयात पत्रकारांशी बोलत होते.

मुंबई - देशातील शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमुक्ती मिळावी आणि उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळावा, यासाठी दोन स्वतंत्र खासगी विधेयके आगामी अर्थसंकल्पी अधिवेशनात संसदेत मांडणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी सांगितले. ते मंत्रालयात पत्रकारांशी बोलत होते.

खासदार शेट्टी म्हणाले, 'गेल्या 20 आणि 21 नोव्हेंबरला देशभरातील 188 शेतकरी संघटनांनी राजधानी दिल्लीत किसान मुक्ती आंदोलन सुरू केले. यात शेतकरी आत्महत्येवरही एक विशेष सत्र होते. या वेळी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनी देशाच्या सर्वोच्च सभागृहात लोकसभेत शेतकऱ्यांच्या व्यथांची दखल घेतली जात नाही, अशी खंत व्यक्त केली. त्यानंतर शेतकऱ्याशी संबंधित दोन विधेयके आम्ही किसान मुक्ती संसदेत सादर केली. देशातील शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमुक्ती देण्याचा अधिकार 2017 आणि उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याचा अधिकार अशी दोन विधेयके सादर केली. या विधेयकांचा मसुदा देशभर घेऊन जाऊ. शेती क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा करून, वेबसाइटद्वारे या मसुद्यावर सूचना मागवून त्यातून अंतिम मसुदा तयार करावा, असे ठरले. त्यासाठी किसाम मुक्ती संसदेने दोन समित्याही स्थापन केल्या आहेत. त्यानंतर सर्वंकष असा हा मसुदा लोकसभेत आणि राज्यसभेत सादर करावा, असा निर्णय घेतला आहे.''

प्रजासत्ताकदिनी 26 जानेवारीला मुंबईत होत असलेल्या संविधान बचाव आंदोलनाबाबत शेट्टी म्हणाले, की "गेट वे ऑफ इंडिया' येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ दोन तास मूक धरणे आंदोलन केले जाणार आहे. पूर्णपणे अराजकीय असे हे आंदोलन असणार आहे. घटना वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहनही शेट्टी यांनी केले.

दरम्यान, या आंदोलनाच्या तयारीसाठी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्यासोबतही शेट्टी यांनी चर्चा केली. या वेळी झालेल्या बैठकीला विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार कपिल पाटील उपस्थित होते.

देशात सध्या जे वातावरण निर्माण झाले आहे, घटना बदलण्यासाठीच आम्ही सत्तेत आलो आहोत, अशी वक्तव्ये भाजपचे नेते करत आहेत. राज्यघटनेची मोडतोड करण्याचे काम होत आहे. लोकांनी भाजपला घटना बदलण्यासाठी नव्हे, तर विकासासाठी बहुमत दिलेले आहे.
- राजू शेट्टी, खासदार

Web Title: mumbai maharashtra news loanwaiver guarantee rate parliament bill