"महावितरण'ची धावधाव

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 मार्च 2018

मुंबई - राज्यातील शेतकऱ्यांची वीजबिले दुरुस्त करण्याचे काम "महावितरण'ने राज्यभर सुरू केले असून, आतापर्यंत 24 कोटी रुपयांची वीजबिले दुरुस्त केल्याची माहिती समोर आली आहे. "महावितरण'ने आपली वीजबिलांची चूक मान्य करत शेतकऱ्यांची ही रक्कम कमी करून दिली आहे. कंपनीकडे वीजबिल दुरुस्तीसाठी राज्यभरातून एकूण पाच लाखांहून अधिक अर्ज आले आहेत. राज्यातील काही भागांत शेतकऱ्यांचा खरा वीज वापर हा 38 टक्के ते 54 टक्के असल्याची आकडेवारी माहितीच्या अधिकारातून सामोरी आली आहे. सांगली, कोल्हापूर आणि पुणे या जिल्ह्यांतील कृषिपंप ग्राहकांना "महावितरण'ने वीजबिले दुरुस्त करून दिली आहेत.

माहितीच्या अधिकारात खऱ्या वीज वापराऐवजी बोगस आणि जादा विजेचा वापर दाखवत शेतकऱ्यांची वीजबिले फुगविण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्‍यातील निमगाव केतकी फीडरवर 38.8 टक्के वीज वापर असल्याचे माहितीच्या अधिकारातून समोर आले आहे. "महावितरण'ने शेतकऱ्यांच्या थकबाकीपोटी तीन लाख 25 हजार रुपये दाखवले, पण वीजबिल दुरुस्तीनंतर मात्र ही थकबाकी एक लाख 26 हजार 250 रुपयांपर्यंत खाली घसरली आहे. त्यामुळे बोगस थकबाकी 56.45 टक्के असल्याची माहिती स्पष्ट झाली आहे.

कोल्हापूर शहर विभागातील थकबाकी एक लाख 24 हजार 385 रुपये होती, पण वीजबिल दुरुस्तीनंतर ही थकबाकी 80 हजार रुपयांनी कमी झाली. सांगली जिल्ह्यातही मिरज, संख, जत आणि कवठेमहांकाळ या भागात वीजबिले मोठ्या प्रमाणावर दुरुस्त करण्यात आली आहेत. या चारही उपविभागांत 544 ग्राहकांची थकबाकी "महावितरण'ने एक कोटी 14 लाख 79 हजार रुपये दाखवली होती. पण वीजबिल दुरुस्त करत ही थकबाकी 50 लाख 17 हजार रुपये इतकी कमी करण्यात आली आहे. त्यामुळे खरी वीजबिलाची टक्केवारी 43.65 टक्के इतकी होती. पण "महावितरण'ने तब्बल 56 टक्‍क्‍यांनी वीजबिले फुगवून दिली, असे माहितीच्या अधिकारातून स्पष्ट झाले आहे.

'महावितरण' दोन हजार तास कृषिपंप वीजवापराचा दावा करत असली तरीही ज्या पद्धतीने वीजबिले कमी होत आहेत त्यानुसार हा वीजवापर एक हजार तास किंवा त्यापेक्षा कमी आहे, असे स्पष्ट होत आहे. राज्यात फेब्रुवारी महिन्यात ही वीजबिले दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार आतापर्यंत 24 कोटी रुपये वीजबिलातून कमी करण्यात आले असल्याची माहिती आहे. शेतकऱ्यांच्या थकबाकीपोटी 21 हजार कोटी रुपयांची थकबाकी "महावितरण'कडून दाखविण्यात येत आहे. पण प्रत्यक्षात मुद्दल रक्कम 11 हजार कोटी असून, उर्वरित रक्कम ही व्याज आणि दंडापोटी वाढत गेलेली आहे.

5 लाख वीजबिल दुरुस्तीसाठीचे अर्ज
24 कोटी रुपयांची बिले दुरुस्त

Web Title: mumbai maharashtra news mahavitaral electricity bill