मराठा विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 12 ऑगस्ट 2017

मुंबई - मराठा क्रांती मोर्चाला दिलेल्या आश्‍वासनानुसार मराठा समाजातील विद्यार्थ्यांना इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) धर्तीवर 605 अभ्यासक्रमांत शैक्षणिक सवलती देण्याच्या निर्णयावर राज्य मंत्रिमंडळाने शुक्रवारी शिक्कामोर्तब केले. मराठा क्रांती मोर्चाला 48 तास उलटण्यापूर्वी हे आश्‍वासन पूर्ण केल्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत सांगितले. यापूर्वी 35 अभ्यासक्रमांत मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कात सवलत मिळत होती.

उत्पन्नाची मर्यादा सहा लाख रुपये करण्याची या समाजाची मागणी होती. असे असताना सरकारने हा निर्णय घेतला नसल्याचा आक्षेप घेत विरोधी पक्षांच्या सदस्यांनी सभात्याग केला. दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दिलीप वळसे-पाटील यांनी तावडे यांचे निवेदन पुरेसे नसून, अभ्यासक्रमांच्या यादीसह सविस्तर लेखी निवेदन सभागृहात ठेवण्याची मागणी केली.

घटनेतील तरतुदीनुसार मुस्लिमांना आरक्षण देण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. "एमआयएम'चे आमदार इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्र्यांकडे मुस्लिम आरक्षणाची मागणी केली. भाजप सरकारकडूनच मुस्लिमांना आशा असल्याची भावना व्यक्त करत त्यांनी या वेळी कॉंग्रेसवर जोरदार टीका केली. 60 वर्षांत मुस्लिम समाजाला न्याय मिळाला नाही; मात्र आता फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर आमचा विश्वास असल्याचे ते म्हणाले. यावर कॉंग्रेसच्या आमदारांनी जोरदार हरकत घेत "ये अंदर की बात है, एमआयएम-भाजप साथ है...!! अशी घोषणाबाजी केली.

Web Title: mumbai maharashtra news maratha student educational concession