स्वदेशी वैद्यकीय उपकरणे नवउद्योजकांनी बनवावीत - नरेंद्र मोदी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 मे 2017

मुंबई - सामान्यांना रास्त दरात आरोग्यसेवा देता यावी यासाठी नवउद्योजकांनी स्वदेशी वैद्यकीय उपकरणे बनवण्यावर भर द्यावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (ता. 25) केले.

मुंबई - सामान्यांना रास्त दरात आरोग्यसेवा देता यावी यासाठी नवउद्योजकांनी स्वदेशी वैद्यकीय उपकरणे बनवण्यावर भर द्यावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (ता. 25) केले.

टाटा मेमोरियल सेंटरच्या सेवेला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त झालेल्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे नवी दिल्लीतून संवाद साधला. उपचारासाठी वापरण्यात येणारी 70 टक्के उपकरणे परदेशातून आयात करावी लागतात, त्यामुळे उपचारांचा खर्च वाढतो. परदेशांवरील हे अवलंबित्व कमी करण्यासाठी नवउद्योजकांनी प्रयत्न करावेत, तसेच संशोधनही करावे, असेही पंतप्रधान म्हणाले.

भारतात दरवर्षी दहा लाख लोकांना कर्करोग झाल्याचे निदान होते. तीस वर्षांत ही संख्या दुप्पट होण्याची भीती या क्षेत्रातील संशोधन संस्था व्यक्त करतात. म्हणून या रुग्णांना सर्वांत चांगले उपचार मिळावेत, यासाठी सर्व कर्करोग रुग्णालयांना एकाच अमलाखाली आणण्याचे सरकारचे धोरण आहे. आमचे सरकार सत्तेवर आले तेव्हा अशा 36 कर्करोग रुग्णालयांचा एक गट बनवण्यात आला होता. आता रुग्णालयांची संख्या 108 पर्यंत पोचली आहे, असेही मोदी यांनी सांगितले.

टाटा मेमोरियल सेंटरच्या या क्षेत्रातील अनुभवाचा फायदा घेऊन वाराणसी, चंदीगड, विशाखापट्टणम आणि गुवाहाटी येथेही कर्करोग संशोधन केंद्रे उभारली जात आहेत. त्याखेरीज हरियानातील झज्जर येथेही राष्ट्रीय कर्करोग संस्था उभारण्यात येईल, त्यामुळे आता तेथील रुग्णांना दूरच्या रुग्णालयात जावे लागणार नाही, असेही ते म्हणाले.
रुग्णांना रास्त दरात सर्वोत्तम आरोग्यसेवा द्यावी हे सरकारचे उद्दिष्ट आहे. त्यानुसारच राष्ट्रीय आरोग्य धोरण आखण्यात आले आहे. सर्वंकष आरोग्यसेवा गरिबांना देण्यासाठी सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या अडीच टक्के वाटा या सेवेला देण्याचेही सरकारने ठरवले आहे. देशभरात अनेक नवी एआयआयएमएस (एम्स) तसेच वैद्यकीय महाविद्यालये उभारून प्रत्येक नागरिकाला सर्वांत चांगली वैद्यकीय सेवा दिली जाईल, असेही मोदी यांनी सांगितले.

रतन टाटांचे काम प्रशंसनीय
पंतप्रधानांनी पुस्तक प्रकाशन करताना टाटा मेमोरियल सेंटरच्या कामाची स्तुती केली. प्रशिक्षण, मनुष्यबळ विकास, तसेच संशोधन या क्षेत्रात या संस्थेने केलेल्या कामाची बरोबरी करणे फारच थोड्या रुग्णालयांना जमले आहे. रतन टाटा आणि टाटा मेमोरियल रुग्णालय यांनी गरिबांची सेवा करण्याचे केलेले काम प्रशंसनीय आहे, असे गौरवोद्‌गारही मोदी यांनी काढले.

Web Title: mumbai maharashtra news medical instrument making new businessman