सत्ताधाऱ्यांचाच सभात्याग!

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

विरोधक परिषदेत बोलू देत नसल्याचा आरोप; महेता यांच्या राजीनाम्यासाठी गोंधळ

विरोधक परिषदेत बोलू देत नसल्याचा आरोप; महेता यांच्या राजीनाम्यासाठी गोंधळ
मुंबई - 'एसआरए' प्रकल्पातील भ्रष्टाचारावरून गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी करत विरोधकांनी बुधवारी विधान परिषदेत जोरदार गोंधळ घातला. त्यामुळे सत्ताधारी आमदारांनी सभात्याग करून याचा निषेध नोंदवला. त्यामुळे परिषदेचे कामकाज पहिल्यांदा दोन वेळा आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. विशेष म्हणजे राज्याच्या संसदीय कारकिर्दीत पहिल्यांदाच सत्ताधाऱ्यांचा सभात्याग असल्याचे मानण्यात येते.

राष्ट्रवादीचे किरण पावसकर यांनी मुंबईतील बोरिवली येथील "एसआरए'संदर्भातील लक्षवेधी मांडली होती. या "एसआरए' संबंधित 1999 ते 2017 या काळात पाच वेळा प्रश्न उपस्थित करण्यात आल्याचे पावसकर यांनी सांगितले. त्यामुळे यात मंत्र्यांचा हात असावा, अशी शंकाही उपस्थित केली. या लक्षवेधीला गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर उत्तर देत होते. मात्र विरोधक ऐकण्याच्या स्थितीत नव्हते.
या चर्चेदरम्यान ""झोपडपट्टी सुधार प्राधिकरण (एसआरए) भ्रष्टाचाराचे कुरण बनले असून अधिकाऱ्यांपासून मंत्र्यांपर्यंत सर्व जण भ्रष्टाचाराच्या चिखलात बरबटलेले आहेत. मुंबईतल्या ताडदेवच्या एमपी मिल प्रकल्पाच्या विकसकाला 700 कोटींचा गैरफायदा मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नावे भ्रष्टाचार करणारे गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता यांनी म्हाडाने बिल्डरकडून परत घेतलेला घाटकोपर येथील 19 हजार चौरस मीटरचा भूखंड नियम डावलून पुन्हा त्याच विकसकाला परत दिल्याचे उघड झाले आहे. हे प्रकरण गंभीर असून त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी मंत्री महेता यांचा राजीनामा घ्यावा,'' असा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. यावरून विधान परिषदेत जोरदार गोंधळाला सुरवात झाली. त्यामुळे सत्ताधारी आमदारांनी सभात्याग केला.

दरम्यान, विधान परिषदेत विरोधकांचे संख्याबळ अधिक असल्यामुळे मंत्र्यांना आणि सत्तारूढ पक्षांच्या आमदारांना जाणीवपूर्वक बोलू दिले जात नाही. पाशवी बहुमताच्या जोरावर दादागिरी सहन करणार नाही. त्यामुळे सभात्याग केल्याचे विधिमंडळ कामकाजमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले. ""सगळे नियम पायदळी तुडवत गोंधळ घालून सभागृह चालू न देण्याचे काम कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते करीत आहेत. म्हणून कामकाजावर बहिष्कार घातला,'' असे शिवसेनेचे अनिल परब यांनी सांगितले.

पळाले रे सत्ताधारी पळाले
सभापती माणिकराव ठाकरे यांनी वायकर यांना यावर उत्तर देणार का, असे विचारले तर "माझ्या संबंधित असलेल्या कामाबाबत उत्तर देणार' असे वायकर यांनी उत्तर दिले. मात्र वायकर यांच्या या उत्तरावर विरोधकांनी "न्याय द्या न्याय द्या, वायकराना न्याय द्या' अशा घोषणेला सुरवात केली. त्या वेळी अभूतपूर्व गोंधळ झाला. पहिल्यांदा दहा मिनिटांसाठी आणि नंतर पंधरा मिनिटांसाठी सभागृहाचे काम तहकूब केले होते. नंतर मात्र विधान परिषदेचे काम दिवसभरासाठी थांबविण्यात आले. "पळाले रे पळाले सत्ताधारी पळाले' अशा घोषणा देत विरोधक सभापतींसमोरच्या मोकळ्या जागेत जमा झाले होते.

मंत्र्यांना आणि सत्तारूढ पक्षांच्या आमदारांना परिषदेत जाणीवपूर्वक बोलू दिले जात नाही. त्यामुळे आम्ही सभात्याग केला.
- गिरीश बापट, विधिमंडळ कामकाजमंत्री

विधान परिषदेत नियमाप्रमाणे कामकाज होत नाही. गेल्या सात दिवसांत एकही विधेयक संमत झालेले नाही. हे ज्येष्ठांचे सभागृह आहे, इथे चर्चा अपेक्षित आहे. पण विरोधी पक्षांचे सदस्य सत्ताधाऱ्यांना बोलूच देत नाहीत.
- चंद्रकांत पाटील, विधान परिषदेतील सभागृह नेते.

Web Title: mumbai maharashtra news meeting discard by ruling party!