ऑनलाइन गैरव्यवहाराने शेतकऱ्यांना मनस्ताप - सुनील तटकरे

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 24 नोव्हेंबर 2017

मुंबई - "डिजिटल महाराष्ट्राच्या नावाखाली ऑनलाइन अर्ज मागवण्याचा एक नवीन फंडा या सरकारने काढला असून, ऑनलाइनमध्येच गैरव्यवहार झाल्याने शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी मनस्ताप होत आहे.

कर्जमाफी मिळण्याच्या वारंवार तारखा बदलणारे हे खोटारडे सरकार आहे, अशा आक्रमक शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी गुरुवारी सरकारवर टीका केली आहे.

मुंबई - "डिजिटल महाराष्ट्राच्या नावाखाली ऑनलाइन अर्ज मागवण्याचा एक नवीन फंडा या सरकारने काढला असून, ऑनलाइनमध्येच गैरव्यवहार झाल्याने शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी मनस्ताप होत आहे.

कर्जमाफी मिळण्याच्या वारंवार तारखा बदलणारे हे खोटारडे सरकार आहे, अशा आक्रमक शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी गुरुवारी सरकारवर टीका केली आहे.

राष्ट्रवादी भवनात आज झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 'ऑनलाइन कर्जमाफीत सततचे अडथळे येत असताना सहकारमंत्र्यांनी ऑनलाइन प्रक्रियेत गैरप्रकार झाला आहे, असे स्पष्ट केले. यामुळेच सरकारने माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव विजय गौतम यांना सक्तीच्या रजेवर पाठवले. शेतकऱ्यांनी सरकारच्या जाचक आदेशानुसार रांगा लावून कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरले; मात्र सरकारच्या ऑनलाइन गैरव्यवहाराने या लाखो शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवल्याची टीका तटकरे यांनी केली. सरकारचा खोटारडेपणा व ऑनलाइन गैरव्यवहाराच्या पार्श्‍वभूमीवरच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने 1 डिसेंबर ते 12 जानेवारीदरम्यान विदर्भात "हल्लाबोल' आंदोलन व पायी दिंडी काढण्यात येणार असून, 12 डिसेंबर रोजी शरद पवार यांच्या उपस्थितीत जाहीर सभा होणार असल्याची माहिती तटकरे यांनी दिली.

शिष्यवृत्तीही अडचणीत...
राज्यातील गरीब शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे खोटे आश्वासन सरकारने दिले. ओबीसी, एससी, एसटी समाजातील लाभार्थ्यांचे अर्ज ऑनलाइन मागवण्यात आले; परंतु या ऑनलाइन प्रक्रियेमुळे शिष्यवृत्त्या मिळालेल्या नाहीत. सरकारचा डिजिटलचा प्रयत्न फसला आहे. यामुळे समाजातील सर्व घटक वंचित राहिले आहेत, असा आरोप तटकरे यांनी केला.

कॉंग्रेससोबत आघाडी
राज्यातील आगामी विधान परिषदेच्या एका जागेच्या निवडणुकीमध्ये कॉंग्रेससोबत आघाडी करणार असल्याचे सांगतानाच तटकरे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शिवसेनेसोबत असल्याच्या राजकीय पटलावरील चर्चेला पूर्णविराम दिला. त्याचबरोबर गुजरात निवडणुकीमध्ये कॉंग्रेससोबत आघाडी करणार असल्याचे सांगत राष्ट्रवादी कॉंग्रेस पाच ते सात जागा लढवणार असल्याचे स्पष्ट केले.

Web Title: mumbai maharashtra news Mistake to Farmers Online Misleading