विधिमंडळ आवारात आमदारांचा फुटबॉल

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

अध्यक्ष इलेव्हन विरुद्ध सभापती इलेव्हन रंगला सामना

अध्यक्ष इलेव्हन विरुद्ध सभापती इलेव्हन रंगला सामना
मुंबई - जागतिक फुटबॉल महासंघाची (फिफा) 17 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धा ऑक्‍टोबर महिन्यात भारतामध्ये होत आहे. केवळ भारतामध्येच नव्हे, तर संपूर्ण भारतीय उपखंडामध्ये होणारी ही पहिलीच फिफाची विश्वचषक स्पर्धा आहे. याच निमित्ताने आज महाराष्ट्र विधानभवनाच्या आवारात "अध्यक्ष इलेव्हन' विरुद्ध "सभापती इलेव्हन' असा आमदारांचा फुटबॉल सामना रंगला. नेहमी विधिमंडळात महाराष्ट्राच्या कोट्यवधी जनतेचे प्रतिनिधित्व करीत त्यांचे प्रश्न व समस्या मांडणारे आमदार आज फुटबॉल खेळण्यात दंग होते. अध्यक्ष इलेव्हन विरुद्ध सभापती इलेव्हन हा असा मैत्रीपूर्ण सामना चांगलाच रंगला. क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या सामन्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समालोचन केले.

17 वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धा भारतात होणार असून, त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "मिशन 1 मिलियन'ची घोषणा केली आहे. त्यासाठी राष्ट्रीय स्तरावर मिशन 11 मिलियन हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात "मिशन 1 मिलियन' हा फुटबॉल क्रांती प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्याला प्रतिसाद देत महाराष्ट्रात क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी "मिशन 1 मिलियन- अवघा महाराष्ट्र फुटबॉलमय' अभियानाची योजना केली आहे. याच संकल्पनेतून आज विधिमंडळाच्या परिसरातील वाहनतळाच्या मोकळ्या जागेत "अध्यक्ष इलेव्हन' विरुद्ध "सभापती इलेव्हन' असा सामना आयोजित केला होता. सर्वपक्षीय आमदार या फुटबॉल सामन्यामध्ये सहभागी झाले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, उपसभापती माणिकराव ठाकरे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, यांच्या प्रमुख उपस्थितीत दोन्ही संघांच्या कर्णधारांच्या समोर सामन्याचा टॉस उडविण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किक मारून फुटबॉल सामन्याचा शुभारंभ केला. मुख्यंमत्री फडणवीस यांनी या सामन्याचे समालोचन केले.

हा सामना पाहण्यासाठी विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, उपसभापती माणिकराव ठाकरे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश बापट, अजित पवार, सुनील तटकरे, पतंगराव कदम, पंकजा मुंडे, गिरीश महाजन यांच्यासह सर्वपक्षीय आमदार उपस्थित होते.

Web Title: mumbai maharashtra news mla football competition at vidhimandal