मुंबई-गोवा महामार्गाची 15 ऑगस्टपूर्वी दुरुस्ती - चंद्रकांत पाटील

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

मुंबई - मुंबई-गोवा महामार्गाची दुरुस्ती गणेशोत्सवापूर्वी करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून, येत्या 15 ऑगस्टपर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण केले जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत दिली. तसेच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचा पनवेल ते इंदापूर हा पहिला टप्पा मार्च 2018 पर्यंत, तर इंदापूर-झाराप हा दुसरा टप्पा मार्च 2019 पर्यंत पूर्ण होणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

कॉंग्रेसचे नारायण राणे यांनी महामार्गाच्या चौपदरीकरण आणि रस्त्यावरील खड्डे यावर लक्षवेधी उपस्थित केली. मुंबई-गोवा महामार्गाची चाळण झाली असून, प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याचे निदर्शनास आणून दिले. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली. यावर चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिले.
मात्र ही दुरुस्ती 15 ऑगस्टपर्यंत करणार असल्याच्या पाटील यांच्या दाव्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार सुनील तटकरे यांनी शंका उपस्थित केली. त्यावर पाटील म्हणाले, की एकावेळी दोन ठेकेदारांकडून काम करून घेतले जात आहे. तसेच काम तपासूनच बिलाची रक्कम दिले जाणार आहे.

मागच्या वर्षी गणेशोत्सव काळात पुणे द्रुतगती मार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी दिली गेली होती. त्याप्रमाणेच या वर्षीसुद्धा टोलमाफी देण्याची मागणी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली. गतवर्षीप्रमाणे यंदाही टोलमाफी देण्याचा प्रयत्न करू, असे अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.

Web Title: mumbai maharashtra news mumbai-goa highway repairing