'गुजरात'मुळे राणेंच्या मंत्रिपदाला तूर्तास ब्रेक?

'गुजरात'मुळे राणेंच्या मंत्रिपदाला तूर्तास ब्रेक?

मुंबई - येत्या 7 डिसेंबर रोजी होणाऱ्या विधान परिषदेतील पोटनिवडणुकीत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या विजयासाठी 145 आमदारांचा आकडा गाठता नाही आला, तर राणे यांचा पराभव होऊ शकतो आणि त्याचे पडसाद गुजरात निवडणुकीवर पडले, तर भाजपाला नामुष्कीला तोंड द्यावे लागण्याच्या भीतीमुळे राणे यांचे मंत्रिपद लांबणीवर पडणार असल्याचे सध्याचे चित्र आहे.

नारायण राणे यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर कॉंग्रेसकडून मिळालेल्या आमदारकीचा त्यांनी तातडीने राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यामुळे विधान परिषदेतील रिक्‍त झालेल्या एका जागेसाठी येत्या 7 डिसेंबर रोजी पोटनिवडणूक होत आहे. ही जागा विधानसभा सदस्यांमधून निवडून द्यावयाची आहे. एकाच जागेसाठी निवडणूक होत असल्याने विजयासाठी 145 मतांची आवश्‍यकता आहे. विधानसभेत भाजपचे 122, शिवसेना 63, कॉंग्रेस 42, तर राष्ट्रवादी कॉंग्रेस 41 असे पक्षीय बलाबल आहे. भाजपकडे सर्वाधिक संख्याबळ असले तरी राणे यांचे शिवसेनेसोबत असलेले संबंध आणि प्राप्त परिस्थितीत राणेंच्या पराभवासाठी शिवसेनेसह विरोधक एकवटले तर राणे यांचा पराभव होऊ शकतो. दुसरीकडे भाजपसाठी गुजरात विधानसभेची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची ठरली आहे. गुजरात निवडणुकीसाठी 9 आणि 14 डिसेंबर रोजी मतदान होत आहे. राणे यांचा विषय राष्ट्रीय स्तरावर चर्चेला गेला असल्याने त्यांचा पराभव झाल्यास विरोधकांकडून गुजरात निवडणुकीत हा विषय उपस्थित केला जाऊ शकतो. त्यामुळे राणे यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपनेते या पोटनिवडणुकीबद्दल साशंक आहेत.

नारायण राणे यांना मंत्री केल्यास सहा महिन्यांच्या आत त्यांना विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांपैकी एका सभागृहाचे सदस्य व्हावे लागणार आहे, त्यामुळे राणे यांचे मंत्रिपद सध्यातरी लांबणीवर पडण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. राणे यांना नवीन वर्षात मंत्री केल्यास ही तांत्रिक अडचण दूर होणार आहे. कारण राणेंचा नवीन वर्षात मंत्रिमंडळात समावेश झाल्यास सहा महिन्यांत येत्या जून आणि जुलै 2018 मध्ये विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी निवडणूक होत आहे. यात विधानसभा सदस्यांतून निवडून द्यावयाच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या चार, कॉंग्रेसच्या तीन, भाजपच्या दोन, शिवसेना आणि शेकापच्या प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे. विधानसभेतील भाजपचे संख्याबळ लक्षात घेतल्यास त्या वेळी राणेंना निवडून आणणे भाजपला सहज शक्‍य आहे.

पुढील वर्षात (जुन/जुलै) रिक्‍त होणाऱ्या जागा
कॉंग्रेस - संजय दत्त, शरद रणपिसे आणि माणिकराव ठाकरे.
राष्ट्रवादी - जयदेव गायकवाड, सुनील तटकरे, नरेंद्र पाटील आणि अमरसिंह पंडित.
भाजप - भाई गिरकर आणि महादेव जानकर
शिवसेना - ऍड. अनिल परब
अन्य जागा - जयंत पाटील - शेकाप

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com