राणेंची नवी 'इनिंग'

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 2 ऑक्टोबर 2017

मुंबई - माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी अखेर नवीन पक्ष स्थापन केल्याची घोषणा आज केली. महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष असे त्यांच्या नव्या पक्षाचे नाव असेल. हा पक्ष भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) भाग होण्याची चर्चा सुरू असतानाच, या नव्या पक्षात किती आमदार येतील यावर, "दुकान तर उघडले आहे, आता किती मंडळी येतील ते पाहू या', असे उत्तर राणे यांनी दिले.

शिवसेनेला सत्तेतून हाकलल्याशिवाय ते सत्तेतून बाहेर पडणार नाहीत असे सांगत त्यांनी, उद्धव ठाकरे हे माणसे जोडणारे नेते नसल्याचे सांगितले. राज ठाकरे यांचा पक्ष केवळ वृत्तपत्रांपुरता उरला असल्याची टीकाही त्यांनी केली. बुलेट ट्रेनला विरोध म्हणजे विकासाला विरोध असे जाहीर करत, नोटाबंदीला विरोध होता तर शिवसेनेचे मंत्री सरकारमध्ये राहून विरोध का करत नाहीत, असा सवालही त्यांनी केला.

पक्षाच्या स्थापनेची घोषणा करताना त्यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष हा राज्यघटनेच्या चौकटीत राहून काम करेल असे सांगितले. उद्धव आणि राज या दोन्ही ठाकरे बंधूंवर टीका करताना ते म्हणाले, 'शिवसेनेला रस्त्यावर उतरायचे असेल, तर त्यांनी सत्तेत राहू नये. हाकलल्याशिवाय शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही.''

सध्या कॉंग्रेसचे आमदार असलेले पुत्र नीतेश महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात केव्हा प्रवेशणार, या प्रश्‍नावर ते म्हणाले, 'त्यांनी ज्योतिषाला मुहूर्त विचारला आहे, त्याने तो कळवला की मग नीतेश येईल. मी तेव्हा पत्रकारांना तारीख सांगेन.''

शिवसेनेवर टीका करतानाच या पक्षात उद्धव ठाकरे सोडून सगळेच आपले मित्र आहेत. कॉंग्रेसमध्ये अशोक चव्हाण वगळता सर्व दोस्त आहेत अन्‌ राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये तर सगळेच आपले आहेत, असे त्यांनी सांगितले.

भाजपच्या योजनांना पाठिंबा
भाजपच्या नेतृत्वातील सरकारने घेतलेल्या निर्णयांचे नारायण राणे यांनी समर्थन केले. बुलेट ट्रेन विकासासाठी आवश्‍यक आहे. 50 वर्षांनंतर सुरू होऊ शकणारी बुलेट ट्रेन आज जर अत्यंत कमी पैशांत इथे येत असेल, तर त्याचा विरोध करणार का? चांगली उत्तम ठिकाणे मुलांना दाखवणार नाही काय? असे प्रश्‍न त्यांनी केले. शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी पैसे नाहीत; पण बुलेट ट्रेनची तयारी केली जाते आहे, हा प्रश्‍न गैर असल्याचे सांगत ते म्हणाले, कर्जमाफीसाठी कोणी कर्ज देत नाही. कर्ज हे बुलेट ट्रेनसाठी मिळते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

मुख्यमंत्रिपदाची आस कायम
'विरोध करण्यासाठी बोलणार नाही, तर नवा पक्ष सरकारला योग्य ते मार्गदर्शन करेल. तशी माझी ती क्षमता आहे, असे नारायण राणे यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्रिपदाची आस आपल्याला अजूनही आहे काय? या प्रश्‍नाच्या उत्तरात, 'होय ती आकांक्षा अद्याप सोडलेली नाही,' असे त्यांनी नमूद केले. आता राज्यव्यापी दौरा करणार असल्याचेही ते म्हणाले.

हा पक्ष भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) भाग होण्याची चर्चा सुरू असतानाच पक्ष स्थापन तर झाला आहे, आमंत्रण येईल तेव्हा बघू, असे राणे म्हणाले. कॉंग्रेस सोडल्यानंतर रिपब्लिकन पक्षासह सर्व पक्षांनी मला आमंत्रण दिले आहे. भाजपच्या नेत्यांशी चर्चा झाली होती, तो पर्याय उपलब्ध आहे, असे ते म्हणाले.

भाजपत प्रवेश करण्यासाठी शिवसेनेचा अडसर होता का ते मला माहीत नाही, असे राणे यांनी सांगितले. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात सामील होणार आहात काय, यावर हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. त्यामुळे हा प्रश्‍न त्यांनाच विचारा, असेही ते म्हणाले. नव्या पक्षाची घटना, झेंडा यावर विचार सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.
नव्या पक्षात किती आमदार येतील, या प्रश्‍नावर ते म्हणाले, 'दुकान तर उघडले आहे, आता किती मंडळी येतील ते पाहू या.''

Web Title: mumbai maharashtra news narayan rane politics