गिर्यारोहक दांपत्याने उचलला अवयवदान चळवळीचा पर्वत

गिर्यारोहक दांपत्याने उचलला अवयवदान चळवळीचा पर्वत

मुंबई - निवृत्त बॅंक कर्मचारी श्रीकांत आपटे (67) आणि माध्यमांसाठी लेखन करत, आध्यात्मातील विज्ञानावर व्याख्याने देणाऱ्या नीला आपटे (60) या दांपत्याने आयुष्याची दुसरी इनिंग अवयवदान चळवळीसाठी सुरू करण्याचा निश्‍चय केला आहे. गिर्यारोहणाची आवड असलेल्या या दांपत्याने या चळवळीचा पर्वत जमेल तितका पेलण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

अवयव निकामी झाल्याने होणारे मृत्यू, आजारी व्यक्तींना समाजात वावरताना होणारा त्रास पाहून श्रीकांत आपटे यांनी अवयवदान चळवळीसाठी पुढील आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला. त्याबाबत योग्य माहिती असावी, यासाठी त्यांनी परळ येथील केईएम रुग्णालयातून कोर्स केला. ते चार वर्षांपासून या चळवळीसाठी काम करत आहेत.

वर्षभरापासून नीला आपटेही त्यांना या कार्यात हातभार लावत असून, त्यांनीही अवयवदान समन्वयकासाठी आवश्‍यक असलेला कोर्स केला आहे. "राजहंस प्रतिष्ठान'च्या माध्यमातून हे दांपत्य अवयवदानासाठी जनजागृती करत आहेत. त्यासाठी लागणारे साहित्य हे दांपत्य स्वतःच्या पाठीवरून वाहून नेतात.

नकारार्थी विचारांचा पगडा लवकर बसत असल्याने लोक अवयवदानासाठी पुढाकार घेत नाहीत. त्यामुळे याबाबत जनजागृती करताना त्यांच्यासमोर सकारात्मक उदाहरणे ठेवावी लागतात, असे श्रीकांत आपटे यांनी सांगितले. कमी प्रमाणात अवयव उपलब्ध होत असल्याने अवयवदानात गैरप्रकार होतात. जास्तीत जास्त लोकांनी मृत्यूनंतर अवयवदान करण्याचा निर्णय घेतल्यास हे प्रकार थांबण्यास मदत होईल, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

आपटे दांपत्याने रविवारी चर्चगेट रेल्वे स्थानकात के. सी. महाविद्यालयातील एनएसएसच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने अवयवदानाबाबत जागृती केली. 17 जानेवारीला ते मुंबई सेंट्रल आणि गोरेगावमध्ये; तर 18 जानेवारीला मालाड येथे जागृती करणार आहेत.

व्हिजिटिंग कार्डवरही आपटे काका-काकू
अनेकदा अवयवदानाबाबत मृत व्यक्तीच्या नातेवाइकांशी संवाद साधण्याची वेळ येते. त्या वेळी ती मंडळी दुःखात असतात. अशा परिस्थितीत एखादा मोठा माणूस आपल्याला काही सांगतोय, असे त्यांना वाटते तेव्हा ते शांतपणे ऐकायला तयार असतात. म्हणून श्रीकांत आणि नीला आपटे यांनी व्हिजिटिंग कार्डावरच "आपटे काका आणि आपटे काकू' असे स्वतःचे नाव टाकून घेतलंय. लोकही त्यांच्याशी बोलताना त्याच नावाने हाक मारतात.

केवळ चार स्थानकांवरच परवानगी
रेल्वे स्थानक परिसरात अनेकदा अवयवदानाबाबत जनजागृती करणाऱ्या आपटे काका-काकूंना पश्‍चिम रेल्वेने सुरवातीला परवानगी देण्यास नकार दिला होता. आम्ही रक्तदानासाठी परवानगी देतो. अवयवदानाच्या जनजागृतीसाठी परवानगी, ही काय भानगड आहे, असे पश्‍चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी विचारले होते. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून परवानगी घेण्याची सूचना चर्चगेट स्थानकातील अधिकाऱ्यांनी केली. पाच दिवसांनंतर परवानगी मिळाली खरी; पण पश्‍चिम रेल्वेवरील 25 स्थानकांपैकी अवघ्या चार स्थानकांवरच जागृती करण्यासाठी मिळाली होती, असे श्रीकांत आपटे यांनी सांगितले.

देवाने आपल्याला सर्व अवयव मोफतच दिले आहेत. मृत्यूनंतरही त्यांचे दान मोफतच करायला हवे. एखाद्याच्या मृत्यूनंतर पार्थिवावरील सर्व अलंकार काढले जातात. देवाने दिलेले अवयवही अलंकारच आहेत. ते वाया जाऊ नयेत, यासाठी त्यांचे मृत्यूनंतर दान करायला हवे.
- नीला आपटे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com