अहल्याबाई जयंतीला मंत्र्यांची बेकी

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 1 जून 2017

मुंबई - अहल्याबाई होळकर यांच्या जयंतीला मंत्रिमंडळातील धनगर समाजाचे दोन मंत्री राम शिंदे व महादेव जानकर यांनी कार्यक्रमाचा सवता सुभा मांडल्याने पंकजा मुंडेंची तारांबळ उडाली, तर धनगर बांधव बुचकळ्यात पडले असल्याची चर्चा आहे.

मुंबई - अहल्याबाई होळकर यांच्या जयंतीला मंत्रिमंडळातील धनगर समाजाचे दोन मंत्री राम शिंदे व महादेव जानकर यांनी कार्यक्रमाचा सवता सुभा मांडल्याने पंकजा मुंडेंची तारांबळ उडाली, तर धनगर बांधव बुचकळ्यात पडले असल्याची चर्चा आहे.

धनगर समाजात अहल्याबाई होळकरांना मानाचे स्थान आहे. अहल्याबाईंच्या जयंतीचा कार्यक्रम समस्त धनगर समाजाच्या वतीने चौंडी (नगर) येथे दरवर्षी साजरा केला जातो. यंदा मंत्रिमंडळातील जलसंधारण खात्याचे मंत्री प्रा. राम शिंदे यांनी चौंडी येथे जयंतीचा कार्यक्रम साजरा करताना उपस्थिती लावली. पशू व दुग्ध खात्याचे मंत्री आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे (रासप) नेते महादेव जानकर यांनी मंत्रालयाशेजारील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये अहल्याबाईंच्या जयंतीचा कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांपासून मंत्रिमंडळातील सदस्यांना जानकर यांनी बोलावले होते. तसेच राज्यभरातून "रासप'चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आलेले होते.

अहल्याबाईंच्या जयंतीचा कार्यक्रम मंत्री शिंदे व जानकर यांनी एकाच ठिकाणी घेऊन धनगर समाजाची एकी दाखवली असती तर खूप बरे झाले असते. राजकारणात पक्ष, गट-तट मान्य आहे. मात्र, समाजाच्या कार्यक्रमासाठी सवता सुभा काय कामाचा? असा सवाल हे कार्यकर्ते करीत होते. त्यामुळे कार्यकर्ते बुचकळ्यात पडल्याचे चित्र निर्माण झाले होते, तर ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांची तारांबळ उडाली होती. पंकजा यांनी अगोदर चौंडी येथे उपस्थिती लावली. त्यानंतर जानकर यांच्या कार्यक्रमासाठी त्या उपस्थित राहिल्या. पंकजा या मंत्री शिंदे यांना भाऊ मानतात. त्यामुळे भावाच्या कार्यक्रमासाठी त्या चौंडीला गेल्या. त्यानंतर जानकर यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहताना त्या म्हणाल्या, ""गोपीनाथ मुंडे हे महादेव जानकर यांना मानसपुत्र मानत होते. त्यामुळे जानकरही माझे बंधू आहेत.'' मात्र, या दोन भावांच्या दोन ठिकाणच्या दोन कार्यक्रमांनी पंकजा यांची तारांबळ उडाल्याचे मानले जाते.

Web Title: mumbai maharashtra news politics in ahilyabai holkar birth anniversary