महेतांवर टांगती तलवार

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 5 ऑगस्ट 2017

आणखी तीन गैरव्यवहार उघडकीस; विधानसभेत गोंधळ

आणखी तीन गैरव्यवहार उघडकीस; विधानसभेत गोंधळ
मुंबई - राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. सलग चौथ्या दिवशी विरोधकांकडून गृहनिर्माण मंत्र्यांचे आणखी तीन गैरव्यवहार विरोधकांकडून उपस्थित करण्यात आले. तसेच या गृहनिर्माण मंत्र्यांच्या विरोधात रोज नवीन माहिती पुढे येत असल्याने त्यांना पदावरून दूर करून त्यांची चौकशी करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. त्यामुळे महेता यांच्या वरील दबाव वाढला असून, उद्या (ता. 5) भाजपच्या राज्यप्रभारी सरोज पांडे राज्याच्या भेटीवर येणार आहेत. विरोधकांच्या गोंधळामुळे विधानसभेचे कामकाज चार वेळा तहकूब करावे लागले.

विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर तालिका अध्यक्ष योगेश सागर यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. मात्र विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्थगन प्रस्ताव मांडायचा असल्याचे सांगत राज्याच्या गृहनिर्माण मंत्र्यांबाबत आणखी नवी माहिती उघडकीस आली असून, मंत्री "साईनिधी प्रा. लि.' कंपनीचे अतिरिक्त संचालक असून, या कंपनीने घाटकोपर येथे खरेदी केलेल्या जागेवर दोन इमारती आहेत. या इमारतीत स्वत:च्या मुलाला आणि नातेवाइकाला बोगस भाडेकरू दाखवून त्यांना सदनिका दिल्या आहेत. तशी माहिती कंपनी व्यवहार मंत्रालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्याचबरोबर घाटकोपरमधील "सम्यक दर्शन' या इमारतीच्या विकसकाविरोधात दाखल करण्यात आलेल्या पोलिस तक्रारीत त्यांच्या पत्नीचे किशोरी प्रकाश महेता असे नाव आहे. मात्र त्यांनी त्यात बदल करून किशोर प्रकाश महेता, असा नावात बदल केल्याचा आरोप करत, याच भागातील संक्रमण शिबिराची आणि "एसआरए'ची जागा एकत्रित करून विकसकाला अधिकचा फायदा मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.
त्यावर योगेश सागर यांनी आपल्याला फक्त मुद्दा मांडण्याची परवानगी दिली असता, तुम्ही तर भाषणच करायला सुरवात केल्याचे सांगत बोलण्यास परवानगी नाकारली.
त्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जयंत पाटील यांनी, विरोधी पक्षनेत्यांनी मांडलेला मुद्दा नवीन असून, त्यावर सरकारकडून निवेदन करावे अशी मागणी केली. तसेच सरकारकडून गृहनिर्माण मंत्र्यांना पाठीशी घालण्याचा प्रकार सुरू असून, हे योग्य आहे का, असा प्रश्‍न केला. यावर विधिमंडळ कामकाज मंत्री गिरीष बापट यांनी मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच भूमिका जाहीर केल्याचे सांगत, चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात येणार असून, त्यात तुम्हाला काय मांडायचे ते मांडा. मात्र आता प्रश्नोत्तराचा तास होऊ द्या, अशी सूचना केली. तरीही गोंधळ सुरूच राहिला. त्यात सभागृहाचे कामकाज चार वेळा तहकूब करावे लागले.
गृहनिर्माण मंत्र्यांचे नाव घेता; त्यांना नोटीस दिली आहे का, असा प्रश्‍न तालिका अध्यक्ष योगेश सागर यांनी विरोधकांना केला. त्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे भास्कर जाधव यांनी हा मुद्दा अध्यक्षांनी नव्हे, तर सत्तारूढ बाकावरून उपस्थित करायचा असतो, अशी आठवण करून दिली. त्यावर राज पुरोहित यांनी हा मुद्दा उपस्थित करण्यापूर्वीच विखे-पाटील यांनी नवीन मुद्दे मांडताना गृहनिर्माण मंत्र्यांचे नाव घेतले नसून, त्यांच्या पदाचा उल्लेख केल्याचे सांगत राधेश्‍याम मोपलवार यांच्याप्रमाणे गृहनिर्माण मंत्र्यांना पदावरून दूर सारून चौकशी करावी. तसेच त्यांना बडतर्फ करून त्यांचा आजच राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली.

महेता यांचे निवेदन
माझा मुलगा हर्ष याचा कंपनीशी संबंध नाही. तसेच मंत्रिपद स्वीकारताना मी राजीनामा दिला होता. पत्नी किशोरी आणि माझी आई यांच्या नावे एक सदनिका आहे. तसेच माझ्या भावाचे नाव किशोर आहे. तो तिथे सध्या राहत आहे, असे निवेदन महेता यांनी सभागृहात केले.
भाजपच्या प्रभारी सरोज पांडे उद्या राज्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे महेता यांच्यावर राजीनाम्याचा दबाव वाढला आहे.

एस. आर. ए. भूखंडात महेतांच्या मुलाला सदनिका
घाटकोपर येथील एस.आर.ए. प्रकल्पात गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी भाडेकरूंऐवजी स्वतःचा मुलगा हर्ष याला अवैधरीत्या सदनिका दिली, तसेच पत्नी किशोरीचे नाव किशोर दाखवत गैरव्यवहार केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज विधानसभेत केला. सलग तिसऱ्या दिवशी महेता यांच्या आरोपाने कामकाज ठप्प झाले. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि गणपतराव देशमुख यांच्या अभीष्टचिंतनापूर्वी आज या मागणीमुळे विधानसभेचे कामकाज सातत्याने बंद पडले. घाटकोपर पूर्वेतील सीटीएस 194 या क्रमांकाच्या भूखंडावर संक्रमण शिबिर असताना प्रत्यक्षात तेथे महेता यांनी गैरव्यवहार केला. मंत्री होण्यापूर्वी ते संचालक असलेल्या कंपनीमार्फत गैरव्यवहार झाल्याचा आरोप ते करीत होते.

Web Title: mumbai maharashtra news prakash mehata in problem